इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनची हेस्कॉमकडे मागणी, बदली न झाल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमचे शहर साहाय्यक कार्यकारी अभियंते अरविंद गदगकर व सेक्शन ऑफिसर सिद्धलिंगप्पा अंगडी हे मागील वर्षभरापासून कॉन्ट्रक्टर व ग्राहकांना या ना त्या मार्गाने त्रास देत आहेत. काम पूर्ण करण्यासाठी पैशांची मागणी करीत आहेत. यामुळे नवीन कनेक्शन, ट्रान्स्फॉर्मरसाठी लाखो रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱयांची तातडीने बदली करावी, अशी मागणी द कर्नाटक स्टेट लायसेन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनने बुधवारी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केली.
वीज कनेक्शनसाठी लाखो रुपये घेणाऱया अधिकाऱयांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. हेस्कॉमचे काही अधिकारी मागील अनेक वर्षांपासून बेळगाव शहरामध्येच सेवा बजावित आहेत. कंत्राटदाराने काम घेतले असतानाही थेट ग्राहकाला गाठून त्याच्यासोबत डील करून पैसे उकळण्याचे प्रकार केले जात आहेत. तसेच कंत्राटदार व ग्राहकांशी वागणेही व्यवस्थित नाही. यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून, अशा अधिकाऱयांची हेस्कॉम व्यतिरिक्त इतर विभागात बदली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक
हेस्कॉमचे मुख्य अभियंते नागराज यांची भेट घेत पदाधिकाऱयांनी सर्व पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. अधिकाऱयांना बजावूनदेखील त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरूच आहे. अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. अन्यथा सर्वसामान्य यामध्ये भरडला जाईल, अशी व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मुख्य अभियंत्यांनी आपण या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिले. साहाय्यक कार्यकारी अभियंते व सेक्शन ऑफिसर अशी जोडगोळी मिळून शहरातील ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करीत असून त्यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर. एम. कुंटे, सेपेटरी अमर सरदेसाई, उत्तम रजपूत, भुपाल देसाई, हरिष पाटील, पवन म्हाळदकर, बडवण्णावर, महेश कंटी, मठपती यांसह संघटनेचे 60 हून अधिक सदस्य उपस्थित होते.
केवळ कटकारस्थान…
असे कोणतेही प्रकार झालेले नाहीत. हे केवळ कारस्थान आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद गदगकर यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
ऊर्जामंत्र्यांकडे फोनवरून तक्रार
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोसिएशनने हेस्कॉमसोबतच खासदार मंगला अंगडी व आमदार अनिल बेनके यांच्याकडेही निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. मंगला अंगडी व अनिल बेनके यांनी अशा अधिकाऱयांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अनिल बेनके यांनी ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांना फोन लावून अधिकाऱयांची बदली करण्याची मागणी केली. तसेच असोसिएशनचे काही सदस्य दोन दिवसांत ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती देणार आहेत.