प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
माहेश्वरी अंधशाळा
माहेश्वरी अंधशाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष शिरीष मालू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी स्वागत केले. बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेच्यावतीने मान्यवरांचा सत्कार केला. संतोष यादव यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. हरिसिंग ठाकुर, बसवराज हम्मवार, भारती इंचगीमठ, वादीराज कलघटगी, राजशेखर हिरेमठ, ओमप्रकाश भंडारी, चंद्रशेखर बेंबगळी, चिंतामणी ग्रामोपाध्ये, राजेंद्र मुंदडा, कीर्ती रजपूत, प्रभाकर नागरमुन्नोळी, नंदकिशोर निखार्गे, अशोक चिंडक यांसह इतर उपस्थित होते.
मराठी विद्यानिकेतन
मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताकदिनी शिक्षिका उषा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. क्रीडा विभागाने डंबेल्स कवायत, रिंग कवायत, अरेबिक्स सादर केले. माया पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
इंडियन डेंटल असोसिएशन
इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात मल्लिकार्जुन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बसवराज मोतीमठ, ऋतुजा बंडिवाडकर, शिल्पा वरळी, नेत्रा सबनीस, डॉ. पोटे उपस्थित होते.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ
रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे बेळगावमध्ये सेवा देणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्लबने शहरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये जावून पोलिसांचा सत्कार केला. अध्यक्षा नैना नेर्ली, सौरभ देसूरकर, धनराज राजोळी यांनी पोलिसांना मिठाई वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.
पायोनियर बँक
दि बेळगाव पायोनियर अर्बन बँक लि. यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन प्रदीप अष्टेकर, गजानन पाटील व सर्व संचालक आणि बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.
किश्तवाड येथे प्रजासत्ताक दिन साजरा
भारतीय सैन्याने कुलीद चौक, किश्तवाड येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. कुलीद चौक येथे उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे नुतनीकरण व सुशोभिकरण भारतीय सेनेद्वारे करण्यात आले. तसेच 100 फूट उंच राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या कुलीद चौकाचे उद्घाटन डॉ. देवांश यादव (आयएएस, उपायुक्त किश्तवाड) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय सेनेचे कमांडींग ऑफिसर खलील पोसवाल (जेकेपीएस, एसएसपी) उपस्थित होते.
यावेळी सैनिकांनी झांजपथक आणि लोकनृत्य सादर केले. झांजपथकाने वातावरण दुमदुमून गेले. किश्तवाड शहराबरोबरच जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये शून्य तापमान आणि प्रचंड बर्फवृष्टी असतानाही ग्रामस्थांनी राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा केला.
भारतीय प्रजा दल
भारतीय प्रजा दलाच्यावतीने अध्यक्ष दीपक हळदणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मिठाई वाटप करण्यात आली.
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे माजी अध्यक्ष रमेश जंगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका रंजना नायक उपस्थित होत्या. यावेळी सत्यनारायण, धन्य पाटील व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. प्रा. डी. के. विरण्णा यांनी स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक-उत्तराधिकारी संघ
बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक व उत्तराधिकारी संघ येथे कर्नाटकचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाध्यक्ष राजेंद्र कलघटगी, विवेकानंद पोटे, एस. के. पाटील, किरण बेकवाड, वर्धमान मरेण्णावर, अरुण देसाई व संघाचे सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
श्री नामदेव दैवकी संस्था
श्री नामदेव दैवकी संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन नामदेव मंदिरामध्ये साजरा करण्यात आला. अध्यक्ष नारायणराव काकडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर समाजातील एस. के. टेलर्सचे मालक सचिन काकडे यांनी 60 फूट उंच मोदी कोट शिवून गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल रोहन उरणकर व अशोक रेळेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाज बांधवांच्यावतीने श्री संत नामदेव मंदिर, खडेबाजार येथून शहरातील बाजारपेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौकातून कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कलमार्गे काकतीवेस, परत श्री संत नामदेव मंदिरपर्यंत तिरंगा यात्रा (बाईक रॅली) काढण्यात आली. अजित कोकणे यांनी आभार मानले.
वाङ्मय चर्चा मंडळ
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल पाटणेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.