साजिद मीर याला काळय़ा यादीत टाकण्यासाठी अमेरिकेचा ‘युएन’मध्ये प्रस्ताव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रसंघातील (युएन) प्रस्ताव चीनने रोखला आहे. भारतानेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. मीर हा भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. 2008 च्या मुंबईतील 26/11 हल्ल्यातील सूत्रधारांमध्ये त्याचा मुख्य समावेश होता. साजिद मीर याला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त करण्याचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीच्या अंतर्गत काळय़ा यादीत टाकण्याचा अमेरिकेचा ठराव चीनने रोखला आहे.
अमेरिकन एजन्सी एफबीआयने मीरला परदेशातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकन नागरिकाची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे या आरोपाखाली आधीच ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी घोषित केले आहे. मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. एफबीआयने मीरच्या अटकेसाठी आणि दोषी ठरविण्यासाठी आवश्यक माहिती देणाऱया प्रत्येकासाठी 50 लाख अमेरिन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.
पाकिस्तानचा वारंवार खोटारडेपणा
साजिद मीरबाबत पाकिस्तान सरकार नेहमीच खोटे बोलत आहे. तो आपल्या देशात असल्याचाही पाकिस्तान इन्कार करत आहे. पाकिस्तानने यापूर्वी साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. जूनमध्ये मीरला ताब्यात घेतल्याची बातमीही आली होती. त्यानंतर एफएटीएफकडून दिलासा मिळेल या आशेने दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा किंवा त्यांच्या अस्तित्वाबाबत चुकीची माहिती देण्याचा आव आणला होता.