50 आणखीन नागरिकांना युक्रेनने बाहेर काढले
रशिया-युक्रेन युद्ध मागील 71 दिवसांपासून सुरू आहे. रशिया युक्रेनच्या शहरांमध्ये क्षेपणास्त्रs डागत आहे. या संघर्षादरम्यान युक्रेनने मारियुपोलच्या अजोवस्टल पोलाद प्रकल्पातून आणखीन 50 नागरिकांना सुखरुप बाहेर काढले आहे. यात 11 मुलांचा देखील समावेश आहे. युक्रेनने या प्रकल्पामधून यापूर्वी 500 नागरिकांना बाहेर काढले होते. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख एंड्री यरमक यांनी याची यापूर्वी माहिती दिली होती.
मारियुपोल आणि अजोवस्टलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एका जटिल मोहिमेच्या पुढल्या टप्प्याला मूर्त रुप दिले आहे. ही मोहीम यशस्वी ठरली असून आम्ही सुमारे 500 नागरिकांना बाहेर काढण्यास यशस्वी ठरलो आहोत असे यरमक यांनी म्हटले आहे.
अजोवस्टल येथील बचावमोहिमेत संयुक्त राष्ट्रसंघाने युक्रेनला मदत केली आहे. याकरता आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाचे आभारी आहोत असे यरमक म्हणाले. मागील महिन्यात युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की आणि संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांच्यात झालेल्या चर्चेत मारियुपोलमध्ये अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा मुद्दा सामील होता.
संक्रमणामुळे होतोय मृत्यू
मारियुपोल येथील अजोवस्टल पोलाद प्रकल्पात अडकून पडलेल्या लोकांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत आहे. प्रकल्पात अडकून पडलेले लोक संक्रमणामुळे मृत्युमुखी पडत असल्याची माहिती प्रकल्पात असलेल्या एका डॉक्टरने दिली आहे. या डॉक्टरने तुर्कस्तानला नागरिक तसेच जखमी सैनिकांना बाहेर काढण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचा प्रतिकार कायम
8 मे रोजी जी7 चे नेते युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. तर डोनेट्स्क आणि लुहान्स्क क्षेत्रात युक्रेनच्या सैन्याने रशियाचे 8 रणगाडे आणि 5 चिलखती वाहनांना नष्ट केले आहे. रशियाने युक्रेनवर 2 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रs डागल्याचा दावा करण्यात आला आहे.
बेलारुसची नवी भूमिका
रशियाने क्रामटोरस्क शहरात युक्रेनियन शस्त्रास्त्र भांडार आणि एक मिग-29 विमान नष्ट केले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेलारुस युक्रेनमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या विशेष सैन्य मोहिमेत सामील होणार नसल्याचे बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको यांनी म्हटले आहे.
पत्रकारावर दंड
रशियात ब्लादिमीर पुतीन सरकारच्या विरोधात भूमिका मांडणाऱया पत्रकाराला दंड ठोठावण्यात आला आहे. या रशियन पत्रकाराचे नाव इल्या अरजर असून त्याच्यावर सैन्यावर टीका करण्याचा आरोप ठेवण्यात आला असून 1 लाख रुबल्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. रशियन सैन्यावर टीका करत देशाच्या हितसंबंधांना नुकसान पोहोचविल्याचा आरोप आहे.