एमबीबीएस-बीडीएस अभ्यासक्रमात मिळणार प्रवेश
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादामुळे पीडित असलेल्या कुटुंबांकरता प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. दहशतवादाने पीडित राहिलेल्या सर्व कुटुंबांच्या मुलामुलींसाठी एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या केंदशासित प्रदेशात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना विशेष स्वरुपात आरक्षण देण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार जम्मू-काश्मीरच्या दहशतवाद पीडित मुलांना वैद्यकीय शिक्षणात दिले जाणारे हे आरक्षण केंद्रीय कोटय़ातून देण्यात येणार आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आईवडिल गमावलेल्या मुलामुलींना या आरक्षणात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी घरातील कमावत्या व्यक्तीला ठार केलेले असल्यास त्यांच्या मुलामुलींना प्राथमिकता दिली जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून दहशतवादाच्या पीडितांसाठी एमबीबीएस-बीडीएस अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय कोटय़ातून जागा उपलब्ध करण्याचा निर्देश दिला होता.
या आरक्षणाच्या कक्षेत जम्मू-काश्मीरचे स्थायी रहिवासी किंवा जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती राहिलेल्याकेंद्रीय/राज्य/केंद्रशासित प्रदेशचे कर्मचाऱयांच्या मुलामुलींचा या आरक्षणाच्या कक्षेत समावेश होणार आहे.