रहिवासी-वाहनधारकांना नाहक त्रास : काम संथगतीने
प्रतिनिधी /बेळगाव
ड्रेनेजसाठी खोदलेल्या चरीकडे मागील काही दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याने मराठा मंडळ समोरील चव्हाट गल्लीतील नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी देऊनदेखील काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन कामासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पावसाळय़ापूर्वी डेनेजलाईनचे काम पूर्ण न झाल्यास गल्लीत चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे.
डेनेजलाईन घालण्यासाठी संपूर्ण गल्लीत चर खोदण्यात आली आहे. दरम्यान खोदलेली माती आणि दगड दोन्ही बाजूला टाकण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी वाहने इतर ठिकाणी लावून घर गाठावे लागत आहे. डेनेजलाईन घालण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने बालक आणि वयोवृद्धांना ये-जा करणे अडचणीचे झाले आहे. शिवाय खोदलेल्या चरीत अनेक लहान मुले पडून दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेनेजलाईनचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरात स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी, डेनेजलाईन आणि इतर कामे हाती घेतली जात आहेत. मात्र विविध वाहिन्यांच्या विकास कामासाठी खोदाई करण्यात येत आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने चरी उघडय़ावर पडल्या आहेत. त्यामुळे डेनेज आणि जलवाहिन्यांच्या खोदाईचा रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.