कोटक महिंद्रा बँकेचे एमडी, सीईओ पद सोडले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे. कोटक महिंद्रा बँकेने शनिवार, 2 सप्टेंबर) आपल्या स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. अंतरिम व्यवस्थेनुसार, सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता आता उदय कोटक यांच्या जागी 31 डिसेंबरपर्यंत बँकेचा कार्यभार सांभाळतील. मात्र, त्यासाठी बँकेला अजूनही आरबीआय आणि बँकेच्या सदस्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. उदय कोटक हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी पदत्याग केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
उदय कोटक बँकेत बिगर कार्यकारी संचालक म्हणून कायम राहणार आहेत. बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून उदय कोटक यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 रोजी संपत होता. मात्र, 2 सप्टेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कोटक यांनी ‘बँकेची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ते पद सोडत आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उदय कोटक यांनी 1985 मध्ये कोटक महिंद्रा ही बिगर बँकिंग फायनान्स कंपनी सुरू केली. काही काळानंतर ती बँक बनली. तेव्हापासून ते या बँकेचे नेतृत्व करीत होते. 2023 मध्ये ते व्यावसायिक कर्जदार बनले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, उदय कोटक यांची एकूण संपत्ती सुमारे 13.4 अब्ज डॉलर आहे.