Tarun Bharat

सचिवांच्या गैरकृत्याच्या निषेधार्थ पंचसदस्याचा राजीनामा

बोरीचे पंचसदस्य विनय पारपतींनी मांडली प्रसार माध्यमांसमोर बाजू

प्रतिनिधी /शिरोडा

 आपल्याला अंधारात ठेऊन पंचायतीतर्फे बांधकाम न झालेल्या घरांना बेकायदेशीरित्या घर नंबर दिले जात असून या कृतीचा निषेध म्हणून बोरी ग्रामपंचायत प्रभाग 2 चे पंचसदस्य विनय पारपती यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंचायत क्षेत्रातील या बेकायदेशीर कृत्याचा उलघडा करीत पंचायत सचिव रुपेश हळर्णकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी पंचसदस्य सुनील बोरकर, सागर बोरकर व सतीश नाईक हे उपस्थित बायथाखोली बोरी येथील हमरस्त्याच्या बाजूला असलेल्या डेंगराळ भागात एका नागरिकाने उभारलेल्या चार खांबांना पंचायत सचिवांकडून कोणत्या आधारावर घर क्रमांक देण्यात आला ? असा प्रश्न विनय पारपती यांनी उपस्थित केला आहे. गोम्स नामक व्यक्तीने या बांधकामाविरुद्ध पंचायतीमध्ये हरकत दाखल केलेली आहे. याची पूर्वीच्या पंचायत सचिवांना पूर्णपणे कल्पना होती. मात्र त्यांच्या जागी बदली होऊन आलेल्या रुपेश हळर्णकर या नवीन सचिवाने कुठलीच चौकशी न करता या आक्षेपार्ह बांधकामाला घर क्रमांक दिल्याचा आरोप पारपती यांनी केला आहे. यासंबंधी सचिवांना आपण पूर्वकल्पना दिली होती. मात्र ही सूचना डावलून घर क्रमांक देण्याचा अधिकार सचिवांना असल्याचे सांगत त्यांनी हा उद्दामपणा केला. या मनमानी व बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणून आपण पंचसदस्यत्वाचा  राजीनामा दिल्याचे पारपती यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपूर्वी दोन व्यक्ती याच जागेत मार्बल विक्रीचा व्यावसाय थाटण्यासाठी आपल्याकडे आल्या होत्या. आपण त्यांना रितसर व्यावसायिक परवाना व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यांच्याकडे संबंधित जागेचा व बांधकामाचा घर क्रमांक असून फक्त मार्बल विक्रीचा परवाना द्यावा ही त्यांची मागणी होती. या प्रकारामुळे पंचायतीकडून परस्पर बेकायदेशीर घर क्रमांक दिले जात असल्याचा उलगडा झाला. पंचायत मंडळाच्या बैठकीत आपण त्याला जोरदार आक्षेप घेत सरपंच व सचिवांना जाब विचारला. आपल्या प्रभागात आपल्यालाच अंधारात ठेवून बेकायदेशीर कृत्ये होत असल्याबद्दल हे प्रकार असह्य़ झाल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रभागात आपण यापूर्वी अनेक चांगली विकासकामे राबवली आहेत. अशा गैरप्रकारांमुळे आपल्याला निवडून दिलेले मतदार ग्रामसभेत या बेकायदेशीर बांधकामांना आपल्याला जबाबदार धरतील. हे दोषारोप येण्यापूर्वी आपण या प्रकरणाची जाहीर वाच्यता केल्याचे पारपती यांनी सांगितले.

पंचसदस्य सुनील बोरकर, सतीश नाईक व सागर बोरकर यांनीही या बेकायदेशीर कृत्यात अडकलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. लोकांनी चांगल्या कार्यासाठी आम्हाला निवडून दिले असून बेकायदेशीर गोष्टींविरोधात   आवाज उठविणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे व आमचा पंचसदस्य विनय पारपती यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. पारपती हे चांगले लोकप्रतिनिधी असून त्यांची पंचायतीला गरज आहे. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण सरपंचाकडे केली आहे, असे सतीश नाईक यांनी सांगितले.

Related Stories

दहावीची परीक्षा रद्द, बारावीचा निर्णय बुधवारपर्यंत

Amit Kulkarni

आंबेडकरांनी देशाच्या सौर्वभौमत्वाला प्राधान्य दिले

Amit Kulkarni

वटपौर्णिमेचा उत्सव सत्तरी तालुक्मयात पारंपारिक पद्धतीने साजरा

Omkar B

मेरशी सांस्कृतिक ट्रस्टच्या अध्यक्षपदी हेमंत गोलतकर

Amit Kulkarni

हिंदू व ख्रिस्ती बांधवांजा आज जागर

Amit Kulkarni

हिंदी देशाची संस्कृती-संस्कारांचे प्रतिबिंब

Amit Kulkarni