प्रतिनिधी /काणकोण
कारवार प्रांतात 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोक कोकणी बोलतात. अशा परिस्थितीत प्रशासकीय भाषा जरी कन्नड असली, तरी कोकणी भाषेतून नामफलक लावण्याचा निर्णय कारवारच्या नगरपालिकेने घेतला आहे. पालिकेचे अध्यक्ष डॉ. नितीन पिकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरसेवक गणपती नाईक, माला हुलस्वार, संदीप तळेकर, नंदा नायक यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
कारवारात आजवर सर्व जाती-धर्मांचे लोक सलोख्याने नांदत आले आहेत. पहिल्यांदाच या ठिकाणी भाषिक वाद निर्माण झालेला आहे. या वादात पडण्यापेक्षा करावारच्या युवकांना सीबर्ड तसेच अन्य सरकारी विभागांत रोजगार कसा मिळेल याकडे या संघटनांनी लक्ष द्यायला हवे होते, असे मत बहुतेक नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केले. कारवारमध्ये कोकणी भाषेचा अधिक वापर होतो. त्यामुळे कन्नडबरोबर देवनागरी कोकणीतून फलक लावण्याचा जो ठराव संमत करण्यात आलेला आहे तो राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल त्यावरून पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. पिकळे यांनी सांगितले.
पंचायतीही पुढे सरसावल्या
दरम्यान, कन्नड भाषेबरोबरच देवनागरी कोकणीतून व्यवहार चालावा, रस्त्यावरील नामफलक कोकणीतून लावण्यात यावेत त्याचप्रमाणे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांवरील नामफलक कन्नडबरोबरच कोकणीतून लावावेत या मागणीला आता सर्वत्र जोर धरायला लागला असून नुकताच मुडगेरी ग्रामपंचायतीने त्यासंबंधीचा ठराव घेतल्यानंतर अन्य पंचायती देखील पुढे यायला लागल्या आहेत. कारवारच्या वयलावाडा करगे ग्रामपंचायतीने देखील देवनागरी कोकणीतून नामफलक लावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कारवारच्या प्रत्येक पंचायतीमध्ये कन्नड भाषेतील पत्रव्यवहार, सरकारी निवेदने, अर्ज कोकणीतून भाषांतर करून देण्यासाठी अनुवादक ठेवावा, असा ठराव या पंचायतीने घेतला आहे.