Tarun Bharat

’नॅशनल’च्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा

400 चौ.मी. जागा मूळ मालकाला भाडेकराराने देणार : मनपा विशेष बैठकीत ठराव

प्रतिनिधी /पणजी

पणजी महानगरपालिकेच्या (सीसीपी) बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील बंद पडलेल्या नॅशनल थिएटरच्या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढताना मूळ मालकाला 400 चौरस मीटर जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

पणजी मार्केटमधील दुकानदारांसोबत चर्चा करून भाडेकरारावर स्वाक्षरी करणे तसेच शहरातील सिने नॅशनल संदर्भात राव आणि कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयुक्त आग्नेल फर्नांडीस, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. पणजी पालिका मार्केटमधील दुकानदारांसोबत भाडेतत्त्वावरील करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली होती. सदर बाजार भाडेकराराचा मुद्दा विधी विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे महापौर श्री. मोन्सेरात यांनी सांगितले. त्याचबरोबर सिने नॅशनल थिएटरच्या मुद्यावर राव आणि कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. त्यानुसार सदर इमारत असलेल्या सुमारे 1700 चौ. मी. जागेवर भविष्यात प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर त्यातील 400 चौ. मी. बांधकाम क्षेत्र राव आणि कंपनीस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सदर थिएटर असलेली सुमारे 1700 चौ. मी. जमीन 1930 पासून राव आण कंपनीच्या ताब्यात आहे. त्या काळात पणजीत करमणुकीचे कोणतेच माध्यम नव्हते. त्यामुळे तत्कालीन काम्र म्युनिसिपाल दे पणजी यांच्या विनंतीवरून सदर जागेत ’ईडन’ नावाने थिएटर उभारण्यात आले.

त्यानंतर 1975 मध्ये सदर जागेसंबंधी नव्याने 30 वर्षांचा करार करण्यात आला व विद्यमान मनपाने 23 एप्रिल 2007 रोजी तो रद्द केला. त्यानंतर 4 मे 2007 रोजी कंपनीतर्फे पत्रव्यवहार करून ’सदर करार रद्द करता येत नाही’, असे मनपाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर नंतरच्या काळात अनेक बैठका घेण्यात येऊन सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश न आल्यामुळे दि. 1 एप्रिल 2022 रोजी नव्याने पत्र सादर करून सदर जागेत प्रकल्प उभारल्यानंतर त्यातील किमान 400 चौ. मी. जमीन पुढील 30 वर्षांसाठी भाडेकरारावर देण्यात यावी, अशी याचना करण्यात आली आहे. या सर्व मुद्यांवर चर्चा केल्यानंतर वरीलप्रमाणे जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Related Stories

पेडणे तालुक्मयालाही चक्रीवादळाचा तडाखा

Amit Kulkarni

काणकोणात ‘इको-टुरिझम’ विकसित करण्याकडे लक्ष देणार

Omkar B

पाच पालिकांचे भवितव्य लटकतेच

Amit Kulkarni

दुध उत्पादकानो सावधान!!! फोंडय़ात फोफावतोय लम्पी वायरस!!

Amit Kulkarni

कोळशाचे कण गोव्याच्या समुद्रकिनाऱयावर

Omkar B

भाजप आज पाळणार ’काळा दिवस’

Amit Kulkarni