प्रतिनिधी /काणकोण
चावडीवरील भागशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून काणकोण नगरपालिकेने गोवा मुक्तीलढय़ातील काणकोणचे हुतात्मे केशव सदाशिव टेंगसे आणि परशुराम आचार्य यांना 18 जून क्रांतिदिनी आदरांजली अर्पण केली. यावेळी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, स्थानिक नगरसेवक रमाकांत ना. गावकर, नगरसेविका सारा देसाई, अमिता पागी, नारसिस्को फर्नांडिस, पालिकेचे निरीक्षक येसो देसाई, भारती मडगावकर, साईश धुरी, प्रेमानंद ना. गावकर, ज्येष्ठ नागरिक नाटिविदाद डिसा, चावडीवरील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता लोलयेकर, आरती कोळंबकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. गोवा मुक्तीसाठी ज्यांनी रक्त सांडले त्या हुतात्मे आणि अन्य सत्याग्रहींच्या त्यागाचे स्मरण यावेळी नगराध्यक्षांनी केले. या हुतात्मा स्मारकाजवळ स्वच्छता राखतानाच त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्याकडे पालिकेने लक्ष द्यावे, असे मत डिसा यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येसो देसाई यांनी केले.