महिलांनी राखी बांधून देशाच्या रक्षकांचे मानले आभार : देशभरात रक्षाबंधन उत्साहात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात गुरुवारी रक्षाबंधन मोठय़ा थाटामाटात साजरे करण्यात आले. देशाच्या सीमेवर तैनात जवानांना राखी बांधून महिलांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीमेवरील जवानांप्रमाणेच राष्ट्रपतींनी राजभवनात देशातील विविध ठिकाणहून आलेल्या चिमुकल्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन साजरे केले. दुसरीकडे देशातील विविध ठिकाणच्या महिला आणि मुलांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या घरची आठवण आल्यावर आणि बहिणीच्या रूपाने एक अनमोल नाते जोडल्याचा क्षण लष्करी बांधवांसाठी खूप आनंदाचा असतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाघा-अटारी सीमेवर रक्षाबंधनाचे अनोखे दृश्य गुरुवारी पाहायला मिळाले. एका गोंडस चिमुरडीने सीमेवर बीएसएफ जवानांना राखी बांधली. याप्रसंगी जवानांनीही हसत-हसत शेवटच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण करण्याचे वचन दिले. वाघा-अटारी सीमेवर महिलांनीही सैनिक बांधवांना राखी बांधून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्याबदल्यात फौजीभाईंनी देशाचे रक्षण करण्याचे वचन आपल्या भगिनींना दिले.
सैन्याबद्दल विचार करत असताना एकच गोष्ट मनात येते ती म्हणजे सीमेचे रक्षण करणारे सैनिक. तथापि, तटरक्षक दल हा देखील लष्कराचा अविभाज्य भाग असून हे जवानही रात्रंदिवस सागरी क्षेत्रात कार्यरत राहून देशाच्या शत्रूंपासून देशवासियांचे रक्षण करतात. रक्षाबंधनाच्या या शुभमुहूर्तावर दमण आणि दीव येथील महिलांच्या गटाने तटरक्षक दलाच्या जवानांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या अन्य किनारपट्टी भागातही तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा जवानांप्रती आदरभाव स्पष्टपणे दिसून आला.
राष्ट्रपती भवनातही रक्षाबंधनाचा जल्लोष
नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपतीभवनात रक्षाबंधनानिमित्त देशातील विविध भागातील मुलांची भेट घेतली आणि त्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा हा पहिलाच रक्षाबंधन सण असल्यामुळे विशेष उत्साह दिसून आला. चिमुकल्यांबरोबरच काही निवडक महिलांनीही राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना राखी बांधली.
पंतप्रधान मोदींनाही बांधल्या राख्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवषी राखी मोठय़ा थाटामाटात साजरी करतात. देशभरातील महिला त्यांना राखी पाठवतात आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अशा परिस्थितीत या शुभमुहूर्तावर देशाच्या विविध भागातील लहान मुलींनी त्यांना राखी बांधून दीर्घायुष्य चिंतिले. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी तुम्हा सर्वांना शुभेच्छा’ अशा शुभेच्छा ट्विट करत दिल्या आहेत. पाकिस्तानमधून मोहसीन शेख हिने यावेळीही मोदींना राखी पाठवून त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आगाऊ शुभेच्छा दिल्या आहेत.