आयुर्वेदिक उपचार केंद्रामार्फत आज मोफत तपासणी शिबिर
प्रतिनिधी /बेळगाव
देशातील 37 कॅन्टोन्मेंट रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापैकी बेळगाव कॅन्टोन्मेंट रुग्णालयातदेखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, दोन महिन्यात 400 हून अधिक रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला आहे. मंगळवार दि. 26 रोजी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या रुग्णालयात बाहय़ रुग्णांसाठी विविध औषधोपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दररोज असंख्य रुग्ण याचा लाभ घेत असतात. या ठिकाणी मोफत उपचार व औषधे दिली जातात. सर्व भागातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयात केवळ कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक उपचार घेत असतात. याचप्रमाणे केंद्र शासनाने आयुर्वेदिक उपचाराला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी देशातील 37 कॅन्टोन्मेंट परिसरात आयुर्वेदिक उपचार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. 3 जून रोजी आयुर्वेदिक उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, आतापर्यंत 400 हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.
या ठिकाणी मोफत उपचार आणि औषधे दिली जातात. अत्यावश्यक आयुर्वेदिक औषधे या केंद्रात उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱयांनी दिली. तसेच आयुर्वेदिक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती या केंद्रात करण्यात आली आहे. या ठिकाणी फार्मासीस्टची नियुक्ती करण्यात आली नाही. पण लवकरच आयुर्वेदिक केंद्रांमध्ये विविध कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाणार आहे. आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात रक्कम मोजावी लागते. मात्र केंद्र शासनाने ही सुविधा मोफत उपलब्ध केली आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेदिक उपचार केंद्राच्यावतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपासणी शिबिर राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.