प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे आयोजित केलेल्या व्हाईस ऑफ रोटरी या सोलो सिंगिंग स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी सादर करण्यात आल्याने स्पर्धा रंगतदार ठरली. बेळगावसह परिसरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन केले.
रविवारी सायंकाळी गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात व्हाईस ऑफ रोटरी ही स्पर्धा पार पडली. बेळगाव, शिरसी, गोवा, विजापूर, कोल्हापूर या परिसरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. दोन फेऱयांमध्ये स्पर्धा पार पडली. पहिल्या फेरीत संगीतकार आर. डी. बर्मन यांची गीते तर दुसऱया फेरीत स्पर्धकांनी स्वतःला आवडती गाणी सादर केली.
स्पर्धेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अभिनेते सचिन पिळगावकर, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, आनंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. परीक्षक म्हणून सचिन पिळगावकर यांच्यासोबत गायक अभिजित कोसंबी व रश्मी सावंत यांनी काम पाहिले. स्वाती सुतार, तुषार मळगी, सृष्टी देसाई, ऋग्वेद कर्ले, स्वाती के., दिव्या नाईक, समीर वायंगणकर, श्रेया देशपांडे, यश दायमा, अनुष्का थाली, राजेश देशपांडे, श्रीनिधी मुद्देबिहाळ, समीर कुडतरकर, पद्मजा पै, अरुण नायक यांनी बहारदार गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
‘तुने ओ रंगीले कैसा जादू किया’ गीताने मिळविली दाद
स्पर्धेमध्ये बहारदार गाणी सादर करण्यात आली. पद्मजा पै यांनी सादर केलेल्या ‘तुने ओ रंगीले कैसा जादू किया’ या गीताला तर टाळय़ांचा कडकडाट झाला. सृष्टी देसाई हिने ‘आपके प्यार में हम सवरने लगे’ या हिंदी गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. याचबरोबर मेरे सपनों की रानी, कुछ ना कहो, कही दूर दीन ढल जाये अशा गाण्यांनी रसिकांची मने जिंकली.