भाविकांच्या संख्येत वाढ, सौंदत्ती मार्गावर बस सुसाट, महसुलात भर
प्रतिनिधी / बेळगाव
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेसाठी परिवहनने अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. दिवसाला 20 ते 25 बसेस यल्लम्माकडे धावू लागल्या आहेत. त्यामुळे परिवहनच्या महसुलातदेखील वाढ झाली आहे.
2 जानेवारीपासून ही विशेष यल्लम्मा यात्रा बससेवा सुरू करण्यात आली आहे. 12 जानेवारीपर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 वाजल्यापासून बसेस यल्लम्माकडे धावत आहेत. तर रात्री 10 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. त्यामुळे यल्लम्मा यात्रेसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आले होते. मात्र यंदा यात्रा आणि जत्रा सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी जादा बसची व्यवस्था केली आहे.
बेळगाव, खानापूर, चंदगड आदी भागातून यल्लम्माला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे या मार्गावर यात्रा काळात परिवहनने जादा बसफेऱ्या सोडल्या आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावर भाविकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान सौंदत्तीकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आहे. यासाठी परिवहनने यात्रा विशेष बससेवा सुरू केली आहे. सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष बससेवा उपलब्ध आहे.
बेळगाव-सौंदत्तीसाठी फुल्ल 120 रुपये तर हाफ 60 रुपये असा तिकीट दर आहे. ग्रामीण भागातून कुटुंबासह यल्लम्माकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात गर्दी वाढू लागली आहे.