वृत्तसंस्था/ राजकोट
मंगळवारी येथे झालेल्या 2023 च्या क्रिकेट हंगामातील पहिल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताने रणजी विजेत्या सौराष्ट्रचा 175 धावांनी दणदणीत पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात शेष भारताच्या सौरभ कुमारला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
शेष भारत संघाने हा सामना तिसऱ्या दिवशीच जिंकला. या सामन्यात शेष भारताने पहिल्या डावात 308 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर सौराष्ट्रचा पहिला डाव 214 धावात आटोपल्याने शेष भारताने पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव 160 धावात आटोपल्याने सौराष्ट्रला निर्णायक विजयासाठी 255 धावांचे आव्हान मिळाले. दरम्यान सौरभ कुमार आणि मुलानी यांच्या अचूक गोलंदाजीसमोर सौराष्ट्रचा दुसरा डाव 34.3 षटकात केवळ 79 धावात आटोपला.
शेष भारताच्या दुसऱ्या डावात अगरवालने 49, साईसुदर्शनने 43, कर्णधार हनुमा विहारीने 48 तर सर्फराज खानने 13 धावा केल्या. सौराष्ट्रच्या पार्थ बुथने 53 धावात 7 गडी तर डी. जडेजाने 65 धावात 3 गडी बाद केले. सौराष्ट्रला विजयासाठी 255 धावांचे आव्हान मिळाले पण सौरभकुमार आणि मुलानी यांच्या भेद गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव केवळ 79 धावात उखडला. सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात डी. जडेजाने 3 चौकारासह 21, देसाईने 13, मंकडने 1 चौकारासह 12 आणि व्यासने 1 चौकारासह 10 धावा केल्या. या सामन्यामध्ये फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली. या सामन्यात शेष भारताच्या सौरभ कुमारने 108 धावात 10 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : शेष भारत प. डाव सर्वबाद 308, सौराष्ट्र प. डाव सर्वबाद 214, शेष भारत दु. डाव 52 षटकात सर्वबाद 160(साई सुदर्शन 43, अगरवाल 49, हनुमा विहारी 22, सर्फराज खान 13, पार्थ भुत 7-53, डी. जडेजा 3-65), सौराष्ट्र दु. डाव 34.3 षटकात सर्वबाद 79 (डी. जडेजा 21, देसाई 13, मंकड 12, व्यास 10, सौरभ कुमार 6-43, मुलानी 3-22, नारंग 1-1).
सराव सामना रद्द
वृत्तसंस्था/ थिरुवनंतपूरम
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी विविध संघामध्ये सरावाचे सामने खेळवले जात आहेत. दरम्यान मंगळवारी येथे आयोजित केलेला यजमान भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सरावाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारताचा इंग्लंडबरोबरचा पहिला सराव सामनाही गेल्या आठवड्यात पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे आता यजमान भारतीय संघ सराव न करताना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला सलामीचा सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियाबरोबर येत्या रविवारी चेन्नईत खेळणार आहे.