मुख्यमंत्री उद्या आठही आमदारांना घेऊन जाणार दिल्लीत
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील राजकीय घडमोडीनंतर जनतेमध्ये ‘त्या आठ’ आमदारांच्या पक्षांतराविरोधात कमालीची संतापाची लाट पसरली असून मंत्रिमंडळातील अस्वस्थता कायम आहे. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आठही बंडखोर आमदारांना घेऊन दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.
आमदार दिगंबर कामत जे दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले त्यांनी मडगाव पालिका नगराध्यक्षपदासाठी उभ्या केलेल्या उमेदवाराचा भाजपसह त्यांच्या नगरसेवकांनी पाडाव केल्याने भाजपसाठी हा पहिला जोरदार धक्का ठरला आहे. त्यातच दिगंबर कामत हे दिल्लीत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटावयास गेले आहेत. मुख्यमंत्री व इतर सात आमदार हे नवी दिल्लीला रविवारी संध्याकाळी जात असून ते आपल्या दिल्ली दौऱयात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेणार आहेत.
आलेक्स सिक्वेरा होणार मंत्री? दरम्यान भाजपमध्ये दोन दिवसांपूर्वी रुजू झालेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पुढील आठवडय़ात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या घडत असलेल्या ताज्या घडामोडी लक्षात घेता दिगंबर कामत यांना द्वितीय स्थानावर घेण्यात येणार आहे आणि मायकल लोबो यांना मागाहून मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. उद्या गोव्यातील काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या आठही आमदारांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे दिल्लीला रवाना होणार आहेत.