रायफलखरेदीकरता वयोमर्यादा निश्चित
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत सातत्याने वाढत असलेल्या गोळीबाराच्या घटनांदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सेमी ऑटोमॅटिक रायफल खरेदी करण्याचे किमान वय 18 वरून वाढवत 21 वर्षे करण्यात आले आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी होचुल यांनी यासंबंधीच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे अमेरिकेत बंदूक नियंत्रण पुढाकार लागू करणारे न्यूयॉर्क पहिला प्रांत ठरला आहे.
डेमोक्रेट होचुल यांनी 10 सार्वजनिक सुरक्षाविषयक विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे. यात नव्या शस्त्रास्त्रांच्या मायक्रोस्टँपिंग अनिवार्य करण्याची तरतूद आहे. यामुळे गोळीबाराच्या घटना रोखण्यास मदत मिळणार आहे. तर ‘रेड फ्लॅग’ कायद्यातही दुरुस्ती करण्यात आली आहे. या कायद्यानुसार न्यायालयांना इतरांसाठी धोकादायक ठरणाऱया लोकांकडून बंदूक काढून घेण्याची अनुमती मिळते.
विधेयकावर स्वाक्षरी करत होचुल यांनी बॉडी आर्मर आणि बुलेटपूफ ड्रेसच्या खरेदीवरही बंदी घातली आहे. याचबरोबर न्यूयॉर्कच्या सोशल मीडिया कंपन्यांनाही देखील पारदर्शक धोरणे अवलंबवावी लागणार आहेत.