घरोघरी गाठीभेटी घेण्यास मात्र पाच जणांना मुभा
प्रतिनिधी / बेळगाव
वायव्य शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवार दि. 13 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे 48 तास आधी सार्वजनिक प्रचारावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शनिवार दि. 11 रोजी सायंकाळी 5 पासून सार्वजनिक प्रचारावर निर्बंध घातल्याचे पत्रक जिल्हाधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.
शनिवारी सायंकाळपासून उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना कोणत्याही जाहीरसभा तसेच जाहीर प्रचार करता येणार नाही. केवळ 5 जणांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन उमेदवारांना प्रचार करण्यास मुभा आहे. मतदारांना कोणतेही आमिष दाखवू नये, दबाव किंवा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू नये, असेही पत्रकात म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.