100 दिवस रोजगाराचीही गरज : अनुदान कामगाराच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याची मजदूर नवनिर्माण संघाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मनरेगा व बांधकाम कामगारांना 2019 पासून कामगार कार्डचे वितरण करण्यात आलेले नाही. या विरोधात बुधवारी मजदूर नवनिर्माण संघाच्यावतीने सुवर्णसौध समोर कामगारांनी एकत्रितरित्या आंदोलन केले. त्याचबरोबर मनरेगा कामगारांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यात बांधकाम व मनरेगा कामगारांची संख्या 15 लाखांच्या आसपास आहे. या कामगारांच्या सुविधेसाठी कामगार कल्याण मंडळाकडून त्यांना विविध सेवा व सुविधा दिल्या जातात. राखीव निधी असतानाही त्याचा योग्य वापर होत नसल्याने कामगारांना फटका बसत आहे. मनरेगा कामगारांना 2019 पासून कामगार कार्डचे वितरण बंद करण्यात आल्याने हे सर्व कामगार सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे त्वरित कामगार कार्डचे वितरण सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर म्हणाले, बांधकाम कामगार व मनरेगा कामगारांना सवलतीपासून वंचित ठेवले जात आहे. निधी असतानाही त्यांचा योग्य विनियोग केला जात नाही. कामगार कल्याण मंडळाने लाभार्थ्यांना घर खरेदी अथवा बांधकामासाठी कर्ज न देता थेट अनुदान कामगाराच्या खात्यामध्ये जमा करावे, असे ते म्हणाले. यावेळी संघटनेचे प्रमुख शिवाजी कागणीकर, राहुल पाटील यासह इतर उपस्थित होते.