मोजमाप करण्यात येत असल्याने कर चुकविणाऱयांना बसणार चाप
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मालमत्तांच्या माध्यमातून 100 कोटी घरपट्टी जमा करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. यानुसार महसूल विभागाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून बहुमजली व्यापारी आणि रहिवासी संकुलातील मालमत्तांची माहिती घेतली जात आहे.
मालमत्ता कर चुकविण्यासाठी अनेक मालमत्ताधारकांनी माहिती लपविली असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त जी. प्रभू यांच्या कालावधीत मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू केली होती. काही महिने ही मोहीम राबवून 6 हजारांहून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मोहीम थांबली होती. सध्या 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवले होते.
इमारतींची संख्या वाढल्याने करातदेखील वाढीची शक्यता
मात्र शहरातील मालमत्तांची संख्या पाहता 1 लाख 40 हजारांहून अधिक झाली आहे. तसेच बहुमजली इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे मालमत्ता करातदेखील वाढ होणे आवश्यक आहे.
त्यामुळे यंदा 100 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी महसूल विभागाच्या बैठकीत केली होती. घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवीन मालमत्तांसह जुन्या मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. मात्र महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांकडे विविध कामाची जबाबदारी सोपविल्याने फेरसर्वेक्षण सुरू करण्यात आले नव्हते.
मालमत्ताधारकांमध्ये धास्ती
मात्र अलीकडे ही मोहीम सुरू केली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मालमत्तांची पाहणी करून मोजमाप करण्यात येत आहे. तसेच कर बसविला आहे का? तसेच किती मोजमाप आहे? याची शहानिशा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जुन्या इमारतींमध्ये बदल करण्यात आले आहेत का? किंवा वरील मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे का? याचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध मालमत्तांची माहिती घेऊन करवसुलीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे कर चुकविण्यासाठी चुकीची माहिती दिलेल्या मालमत्ताधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.