पुणे / वार्ताहर :
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी
(Ramnarayan Gagrani) (वय 65, रा. शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली.
गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजार 660 रुपयांची (45 टक्के) अधिक संपत्ती बाळगली होती. या अधिकच्या मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे रहावयास आल्याची माहिती नांदेडच्या ऍन्टी करप्शनच्या पथकास मिळाली. त्यानंतर नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
अधिक वाचा : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगी यांचे निधन
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गगराणी यांच्यासह पत्नी जयश्री रामनारायण गगराणी (57) मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी (34 सर्व रा. शारदानगर नांदेड) यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात कलम 13 (1) (ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 आयपसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नांदेड एसीबीचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांनी तक्रार दिली आहे. हा गुन्हा 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 या कालावधीत घडला आहे. दरम्यान, गगराणी यांना अटक झाल्याने राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.