एनसीसी छात्रांकडून सलामी देऊन स्वागत : एसकेईतर्फे पन्नू यांचा सत्कार : मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटीला निवृत्त लेफ्टनंट जनरल पी.जे.एस. पन्नू (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) यांनी भेट दिली. यावेळी जीएसएस व आरपीडी कॉलेजच्या एनसीसीच्या छात्रांनी त्यांना सैनिकी सलामी देऊन त्यांचे स्वागत केले.. यानंतर जिमखाना सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा. अरविंद हलगेकर यांनी त्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. ले. जनरल पन्नू यांनी तीनही सेवांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या समन्वयाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच डिफेन्स स्पेस, सायबर एजन्सी तसेच स्पेशल फोर्म डिव्हिजनच्या उभारणीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते निवृत्त लेफ्टनंट जनरल पी.जे.एस. पन्नू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पन्नू म्हणाले, बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. वयाच्या 19 व्या वर्षी मराठा लाईट इन्फंट्री येथे मी रुजू झालो. छत्रपती शिवरायांनी छोट्या सैनिकांपासून मोठी सेना निर्माण केली. त्याच पद्धतीने ही इन्फंट्री कार्य करत आहे. ती नेहमी विश्राम कमांडमध्येच उभी असते. म्हणूनच तिला बिजली की रफ्तार से चलती है असे म्हटले जाते.
विद्यार्थ्यांनी केवळ गुणपत्रिका जमा न करता नेतृत्व गुण विकसित केले पाहिजेत. यापुढे भारताला जगजेता म्हणून काम करावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येकाकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. लोकांना ज्ञान देणे हे एक उत्कृष्ट नेत्याचे काम आहे. म्हणून उत्तम नेत्याला अधिकाधिक माहिती आणि योग्य रस्ता दाखविता आला पाहिजे. प्राध्यापकांनी केवळ शिकवणे अपेक्षित नसून विद्यार्थ्याला कणखर बनविणेही आजची गरज आहे. आज परदेशात भारताची चाणक्यनिती शिकविली जाते. तिचा विसर आपल्याला पडता कामा नये, असे त्यांनी नमूद केले.
किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय भाषणात या संस्थेतून उत्तमोत्तम नेते घडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. सीमेवर जवान लढत असल्याने आपण सुरक्षित आहोत म्हणून इन्फंट्रीला आपण नेहमीच स्मरणार्थ ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. लता लक्ष्मेश्वर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.