आप नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांचा सवाल, कदंब महामंडळात गलथान कारभार चालल्याची टीका
प्रतिनिधी /मडगाव
कदंब महामंडळात काहीच आलबेल नसून व्यवस्थापकीय संचालकाचे पद रिक्त झालेले असताना पुन्हा पुन्हा निवृत्त व्यवस्थापकीय संचालकांना वाढ दिली जात आहे. विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीही योग्य प्रकारे मिळत नसल्याचा दावा करून कदंब महामंडळात एकंदर गलथान कारभार चालला असल्याची टीका आपच्या नेत्या ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त झाले होते. गेल्या वर्षी निवृत्त व्यवस्थापकीय संचालकांना एक वर्षाची वाढ देण्यात आली होती. आता पुन्हा एका वर्षाची वाढ त्यांना दिल्याने या पदासाठी सरकारला योग्य व्यक्ती सापडत नाही काय, असा सवाल कुतिन्हो यांनी केला आहे. कायद्यानुसार यादीत असलेल्या अधिकाऱयाला या पदावर नियुक्त करावे आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे.
विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठांना वाढीव पास दराचा फटका बसत आहे. पासेसचे दर वाढविल्याने विद्यार्थ्यांना जास्त फटका बसला असून त्यांच्या खिशाला ते परवडत नाही. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी उचलून धरली आहे. कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक बसगाडय़ांबरोबर त्यांचे चालकही कंत्राटावर घेतले असून गोमंतकीय चालकांवर हा अन्याय असल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. जास्तीत जास्त रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी करताना गोमंतकीयांना त्यात प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
गप्प नव्हे, शस्त्रक्रियेमुळे घेत होते विश्रांती
प्रतिमा कुतिन्हो यांचा आवाज नाही, त्या चुप्पी साधून का आहेत असे प्रश्न समाजमाध्यमांतून चर्चिले जात आहेत. खास करून विरोधक यास खतपाणी घालत आहेत. मात्र कोणी घाबरण्याची गरज नसून मी गप्प बसणारी व्यक्ती नाही. मी अन्यायाविरुद्ध आघाडींवर येऊन लढणारी महिला आहे. तीन महिन्यांपूर्वी माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी सहा महिने विश्रांती घेण्यास सांगितले होते. आता मी तीन महिन्यांतच देवाच्या कृपेने ठीक झाले असून गोमंतकीयांचे प्रश्न घेऊन लढण्यास सज्ज झाले आहे, असे ऍड. कुतिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.