जत- प्रतिनिधी
जत तालुक्यातील कोसारी येथे पेन्शनचे पैसे दारूसाठी का देत नाही असे म्हणत जन्मदात्या आई-वडिलांना गंभीर मारहाण केली. यात वडिलांना लोखंडी स्टॅन्डने गंभीर मारहाण केल्याने ते जागीच मयत झाल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब कृष्णा तोरवे (वय.७० सेवानिवृत्त सुभेदार) खून झालेल्यांचे नाव आहे. दरम्यान झालेल्या मारहाणीत ललिता आप्पासाहेब तोरवे या जखमी झाल्य़ा आहेत. संशयित आरोपी प्रमोद आप्पासाहेब तोरवे( वय.३५) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबतची फिर्याद सुमन विजय ऐदाळे (वय.६०) यांनी जत पोलिसात दिली आहे. यावरून संशयित आरोपी प्रमोद तोरवे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आप्पासाहेब तोरवे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार आहेत. ते गावातच पत्नी ललिता व मुलगा प्रमोद यांच्यासह वास्तव्यास होता. एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. दरम्यान आप्पासाहेब तोरवे यांना शुक्रवारी पेन्शन मिळाली होती. त्यांनी जत येथील स्टेट बँकेतून पेन्शनचे पैसे घरी आणले होते. दुपारी प्रमोदने आई ललिताकडे पैशाची मागणी केली. आईने माझ्याकडे पैसे नसल्याचे वडिलांकडून घे असे सांगितले. यावेळी आरोपी प्रमोदने आई ललितास बेदम मारहाण केली. मारहाण केल्याने स्वतःच्या बचावासाठी आई घरातून बाहेर निघून गेल्या. शुक्रवारी रात्री बाप- लेकाचे कडाक्याचे भांडण झाले. प्रमोद दारूच्या नशेत असल्याने तो वडिलांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दररोजच्या या भांडणाकडे शेजारच्या लोकांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. शनिवारी पहाटे प्रमोदने घरासमोरील माठ ठेवण्याचा स्टॅन्ड वडिलांच्या डोक्यात घातला. यात आप्पासाहेब तोरवे हे जागीच मृत्यू झाले. या घटनेची पुसटशी कल्पना शेजाऱ्यांना नव्हती. मात्र शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी दारातील रक्ताचा सडा पाहिल्यानंतर अधिक चौकशी केली असता खून झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट देऊन कसून चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे , पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे यांनी घटनेचा पंचनामा केला. व घटनास्थळी मद्याधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरची घटना जत पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे करीत आहेत.