विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी /मडगाव
कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे मडगावच्या ऐतिहासिक लोहिया मैदानावर क्रांती दिनाचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. मात्र, आत्ता कोविड नियंत्रणात येत असल्याने शनिवार दि. 18 जून रोजी क्रांती दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती 18 जून क्रांती दिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून लोहियाचा पुतळा तसेच स्मारक व व्यासपीठ यांचे काम पूर्ण झाले आहे. थोडे काम शिल्लक असून ते पूर्ण झाल्यावर लोहिया मैदानाचे रितसर उद्घाटन केले जाणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी 18 जून रोजी क्रांती दिन साजरा केला जाणार आहे. सकाळच्या सत्रात सरकार तर्फे क्रांती दिन साजरा केला जाणार असून संध्याकाळच्या सत्रात 18 जून क्रांती दिन समिती तर्फे कार्यक्रम होईल.
18 जून रोजी सकाळी 8.15 वा. लोहिया मैदानावर होणाऱया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित राहणार असून ते लोहियाच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून तसेच स्मारकला फुले वाहून आदरांजली अर्पण करतील. या कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिंक तसेच शालेय विद्यार्थी, मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, पालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
संध्याकाळी 3 वा. 18 जून क्रांती दिन समिती च्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा तीन गटांत घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. त्या शिवाय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मडगाव परिसरातील विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
याच कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक व माजी आमदार स्व. गजानन रायकर यांच्या नावाने सत्कार केला जाणार आहे. सत्कारमूर्तीचे नाव मागाहून जाहीर केले जाणार आहे. त्याच बरोबर दहावीच्या परीक्षेत हायस्कूलात प्रथम आलेल्या मडगाव परिसरातील विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फातोर्डाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई तसेच नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हे उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, पालिकेचे मुख्याधिकारी तसेच स्वातंत्र्य सैनिक व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगांवकर, पराग रायकर, नवनाथ खांडेपारकर व रजनी रायकर उपस्थित होते.