प्रतिनिधी /बेळगाव
अखिल भारतीय स्तरावर नीट परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून बेळगावचे नाव रोशन करणाऱया ऋचा मोहन पावशे हिचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे संस्थेच्या मुख्यालयात सत्कार करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर व संचालक पंढरी परब यांच्या हस्ते ऋचाचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरी परब व सीईओ अभिजित दीक्षित यांनी ऋचाला वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले. तिची कामगिरी बेळगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, हे खास नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना ऋचा पावशे हिने लोकमान्य संस्थेच्या संचालकांचे आभार मानले. पावशे घराण्यातील चौथी पिढी वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा देईल, असे अभिमानाने सांगितले. या प्रसंगी लोकमान्यचे कर्मचारी उपस्थित होते.