सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठाच दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खासगी शाळांमध्ये शिकविणाऱया शिक्षकांनाही ग्रॅच्युईटीला लाभ मिळविण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अशा सहस्रावाधी शिक्षकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. अशा शिक्षकांना हा अधिकार देणारा 2009 चा कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे.
न्या. संजीव खन्ना आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी दिला. खासगी शाळांमधील शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीला विरोध करणाऱया 20 हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. या याचिका इंडिपेंडंट स्कूल्स फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था आणि अन्य खासगी शाळांच्या व्यवस्थापनांनी सादर केल्या होत्या. हा निर्णय दिल्यापासून सहा आठवडय़ांच्या आत खासगी शाळांनी सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना व्याजासह ग्रॅच्युईटीची रक्कम द्यावी, असाही आदेश निर्णयपत्रात देण्यात आला आहे.
आर्थिक स्थिती कमजोर
खासगी शाळांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. अनेक राज्यांमध्ये शाळांकडून घेतल्या जाणाऱया शुल्काची रक्कम राज्य सरकारने ठरवून दिलेली आहे. या रकमेपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना ग्रॅच्युईटी देण्याइतका पैसा खासगी शाळा चालविणाऱया संस्थांपाशी नाही, असा युक्तीवाद या शाळांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता.
हे कारण होऊ शकत नाही
शाळा चालविणाऱया संस्थांची आर्थिक स्थिती हे शिक्षकांना ग्रॅच्युईटी नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक राज्यांच्या सरकारांनी शाळांचे शुल्क ठरवून दिलेले आहे, ही बाब सत्य असली तरी शिक्षकांना ग्रॅच्युईटी प्राप्त करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. 2009 चा हा कायदा घटनेच्या चौकटीत बसणारा आहे. त्यामुळे त्याचे पालन सर्व खासगी शाळा संस्थांना करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तो निर्णय लागू होत नाही
खासगी शाळांमधील शिक्षक हे कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना ग्रॅच्युईटीचा नियम लागू होत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच पूर्वी दिलेला आहे, असाही युक्तीवाद शाळांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तीवादही मानला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय केवळ 1997 एप्रिल पर्यंत सेवेत असणाऱया आणि पाच वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या शिक्षकांपुरताच मर्यादित होता, हे न्यायालयाने स्पष्ट केले.