Tarun Bharat

इंडोनेशियात फुटबॉल सामन्यानंतर दंगल

चेंगराचेंगरीत 174 ठार, 180 जखमी ः  रंगतदार फुटबॉल सामन्याला गालबोट

जकार्ता / वृत्तसंस्था

इंडोनेशियातील मलंग शहरात फुटबॉल सामन्यावेळी घडलेल्या दंगल आणि चेंगराचेंगरीच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 174 वर पोहोचली आहे. तसेच अन्य अडीचशेहून अधिक फुटबॉलशौकीन जखमी झाले असून मृतांचा आकडा 200 च्या पुढे जाऊ शकेल असे बोलले जात आहे. फुटबॉल सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात आले. पूर्व जावा येथील मलंग रीजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या हृदयद्रावक घटनेनंतर आठवडाभरासाठी सर्व सामने स्थगित केले आहेत.

कंजुरुहान स्टेडियममध्ये पर्सेबाया क्लब आणि अरेमा फुटबॉल क्लब यांच्यात सामना आयोजित करण्यात आला होता. आपल्या संघाच्या पराभवाने अरेमा क्लबचे चाहते संतप्त होत फुटबॉल कोर्टवर उतरले. मैदानात क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांनी प्रवेश केल्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला होता. अरेमाच्या हजारो समर्थकांनी आपल्या संघाच्या पराभवामुळे निराश होऊन, खेळाडू आणि फुटबॉल अधिकाऱयांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्या. संतप्त चाहत्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्यामुळे अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलीस लोकांना बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच जीव वाचवून लोक कसेतरी पळत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

पोलिसांच्या कृतीने शौकिनांची पळापळ

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्याने घबराट पसरली. गोंधळानंतर शेकडो लोकांनी बचावासाठी कंजुरुहान स्टेडियमच्या एक्झिट गेटकडे मार्गक्रमण करताच चेंगराचेंगरी झाली. तसेच प्रचंड गर्दीमुळे अनेकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. या सर्व घटनेदरम्यान जमावाने पोलिसांच्या वाहनांचीही जाळपोळ केली, असे पूर्व जावा प्रांताचे पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी पत्रकारांना सांगितले.

स्टेडियममध्येच 34 जणांचा मृत्यू

या चेंगराचेंगरीत 2 पोलीस अधिकाऱयांसह 174 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आणि उर्वरित रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले, असेही सांगण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये मलंगमधील लोक स्टेडियममध्ये धावताना दिसत आहेत.

असोसिएशनकडून खेद व्यक्त

फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशियाने या घटनेनंतर एक निवेदन जारी करत कंजुरुहान स्टेडियमवरील अरेमा समर्थकांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. या घटनेने आम्ही दुःखी असून पीडित कुटुंबांची माफी मागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विशेष पथक नियुक्त करून पोलीस दलाने तातडीने या घटनेचा तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली.

अरेमा एफसीवर कारवाई

असोसिएशनने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत अरेमा एफसी संघावर या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी बंदी घातली आहे. लीगचे मालक असलेले अखमद हादियन लुकिता यांनी यासंबंधी माहिती दिली. “पीएसआयच्या अध्यक्षांकडून सूचना मिळाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा आदर करण्यासाठी हे करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांमुळेही चेंगराचेंगरी

देशाचे मुख्य सुरक्षा मंत्री महफूद एमडी यांनी या घटनेसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक घुसल्यामुळे मैदानात प्रचंड गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ 38,000 लोकांची बसण्याची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये 42,000 तिकिटे जारी करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

भविष्यात कठोर धोरण अवलंबणार

इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यांदरम्यान चेंगराचेंगरी आणि तोडफोड होण्याचा इतिहास आहे. क्लबमधील तीव्र प्रतिस्पर्ध्यामुळे समर्थक कधीकधी हिंसक होतात आणि गोंधळ घालतात. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर धोरण अवलंबण्यात येणार असल्याचे इंडोनेशियाचे क्रीडा मंत्री जैनुद्दीन अमली यांनी  सांगितले. तसेच फुटबॉल सामन्यांच्या सुरक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याबरोबरच क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी न देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Related Stories

अस्वल अन् लांडग्यामध्ये झाली मैत्री

Patil_p

नासाकडून चांद्रमोहिमेची घोषणा

Patil_p

विद्यार्थिनींची निदर्शने दडपण्यासाठी बळाचा वापर

Patil_p

बहरिनचे पंतप्रधान शेख खलिफा यांचे निधन

datta jadhav

तब्बल 32 म्युटेंटपासून बनला ‘ओमिक्रॉन’

datta jadhav

युक्रेन पुसून टाकण्याची रशियाची महत्त्वाकांक्षा!

Patil_p
error: Content is protected !!