वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीने घोषित केलेल्या पुऊषांच्या कसोटी संघामध्ये रिषभ पंत या एकमेव भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे.
25 वर्षीय पंतला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाहन अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय इलाज मुंबईमध्ये सुरू आहेत. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, 2023 च्या क्रिकेट हंगामाला त्याला मुकावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात कसोटी प्रकारात पंतने 12 डावात 61.81 धावांच्या सरासरीने तसेच 90.90 स्ट्राईक रेटने 680 धावा जमवल्या होत्या. त्यामध्ये 2 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात पंत कसोटी क्रिकेटमध्ये 21 षटकार ठोकले आहे. तसेच यष्टीरक्षणात त्याने 23 झेल टिपले असून 6 फलंदाजांना यष्टीचित केले आहे. आयसीसीच्या 2022 सालातील कसोटी संघाचे नेतृत्व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. या आयसीसीच्या कसोटी संघामध्ये इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, नाथन लियॉन, उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन यांचा सहभाग करण्यात आला आहे. पाकचा कर्णधार बाबर आझम तसेच दक्षिण आफ्रिकेचा रबाडा आणि विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला या संघात स्थान देण्यात आले आहे.
आयसीसीच्या 2022 सालातील वनडे संघामध्ये मध्यफळीत खेळणारा श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहमद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या वनडे संघाचे नेतृत्व पाकचा कर्णधार बाबर आझमकडे सोपवले आहे. ऑस्ट्रेलियाचे ट्रेविस हेड, अॅडॅम झम्पा, विंडीजचे शाय हॉप आणि अल्झेरी जोसेफ, न्यूझीलंडचे टॉम लॅथम आणि ट्रेंट बोल्ट, झिंबाब्वेचा सिकंदर रझा तसेच बांगलादेशचा मेहदी हसन मिराज यांचा समावेश आहे.
2022 चा कसोटी संघ : स्टोक्स (कर्णधार), उस्मान ख्वॉजा, क्रेग ब्रेथवेट, लाबुशेन, बाबर आझम, बेअरस्टो, रिषभ पंत, कमिन्स, रबाडा, लियॉन आणि अँडरसन.
2022 चा वनडे संघ : बाबर आझम (कर्णधार), ट्रेविस हेड, शाय होप, श्रेयस अय्यर, टॉम लॅथम, सिकंदर रझा, मेहदी हसन मिराज, अल्झारी जोसेफ, मोहमद सिराज, बोल्ट आणि झाम्पा.