एलिमिनेशन राऊंडमध्ये सर्वाधिक 25 टक्के मते प्राप्त
लंडन / वृत्तसंस्था
भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक हे ब्रिटनमधील पंतप्रधानपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करत आहेत. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशन राउंड व्होटिंगमध्ये ऋषी सुनक यांना 88 म्हणजेच 25 टक्के मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते मिळाल्याने ते आघाडीवर आहेत. या शर्यतीत यश मिळाल्यास ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होतील. पण ब्रिटिश खासदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर येथे नव्या पंतप्रधानांच्या निवडीसाठी वेगवेगळे टप्पे सुरू करण्यात आले आहेत. गेल्या आठवडय़ात मंत्री-खासदारांनी साथ सोडल्यामुळे जॉन्सन पदावरून पायउतार झाले होते.
ऋषी सुनक यांच्यानंतर पेनी मॉर्डंट यांना मतदानाच्या एलिमिनेशन फेरीत 67 मते मिळाली. एकंदर 19 टक्के मतांसह पेनी मॉर्डंट दुसऱया स्थानावर राहिले. तसेच लिझ ट्रॉस 14 टक्के मतांसह तिसऱया क्रमांकावर आहेत. केमी बेदेनोक 11 टक्के मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. टॉम टुजेंट यांना 10 टक्के मते मिळाली असून त्यांना पाचवे स्थान मिळाले आहे. तर, भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन 9 टक्के मतांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. एलिमिनेशन राऊंडमध्ये नदिम जाहवी आणि जेरेमी हंट या दोन उमेदवारांना केवळ 7 आणि 5 टक्के मते मिळाल्यामुळे ते पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले.
नेतानिवड प्रक्रिया…
- नव्या नेत्याच्या नामांकनासाठी 2 खासदारांचा प्रस्ताव आवश्यक आहे. अशा स्थितीत पक्षाचे अनेक नेते पंतप्रधानपदासाठी दावा करू शकतात. मात्र, हे चित्र ऑक्टोबरपर्यंतच स्पष्ट होईल.
- पक्षाच्या खासदारांना मतदानाच्या अनेक फेऱयांतून जावे लागेल. पक्षातील महत्त्वाचे वरिष्ठ नेते नावावर एकमत होण्यासाठी प्रयत्न करतील. तरीही ज्याला जास्त मते मिळतील तो दावेदार असेल.
- रिंगणात 2 उमेदवार असेपर्यंत मतदान होईल. साधारणपणे हे मतदान मंगळवार आणि गुरुवारी होते. शेवटच्या 2 उमेदवारांसाठीही मतदान होणार आहे. यापैकी जो विजयी होईल तो पंतप्रधान होईल.