कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने अखेर भारताच्या कायदा आयोगाची स्थापना केली आहे. तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सरकारने केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. शंकरन, प्राध्यापक आनंद पालीवाल, प्राध्यापक डी. पी. वर्मा, प्राध्यापक राका आर्य आणि एम. करुणानिधी यांना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
ऋतुराज अवस्थी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली केलेल्या अवस्थी यांना भारताचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2009 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती. 24 डिसेंबर 2010 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते.
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यापासून कायदा आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. तर न्यायाधीश अवस्थी हे जुलै महिन्यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत. कर्नाटकातील शासकीय महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींच्या हिजाब परिधान करण्याच्या निर्णयाला कायम ठेवणाऱया उच्च न्यायालयातील खंडपीठाचे त्यांनी नेतृत्व केले होते.