

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
चिंचली महाकाली शिक्षण संस्था, फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल व रिवर स्कूल आयोजित 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिवर संघाने फिनिक्स होनगा संघाचा 4-1 असा पराभव करून महाकाली चषक पटकाविला.


रायबाग चिंचली येथील रिवरसाईड शाळेच्या मैदानावर आयोजित फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाकाली शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी एमएलसी विवेकराव पाटील, कुमार करण्यात आले. स्पर्धेचा अंतिम सामना रिवरसाईड चिंचली व फिनिक्स होनगा यांच्यात झाला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला रिवरसाईडच्या गजानन अनुसेच्या पासवर प्रज्वल हंडगेने पहिला गोल केला. 24 व्या मिनिटाला प्रज्वल हंडगेच्या पासवर रोहित कुरनाळेने दुसरा, 40 व्या मिनिटाला रोहित कुरनाळेच्या पासवर प्रज्वल हंडगेने तिसरा गोल केला. तर 49 व्या मिनिटाला गजानन अनुसेने बचावफळीला चकवत चौथा गोल करून 4-0 ची आघाडी रिवरसाईड चिंचलीला मिळवून दिली. या सामन्यात फिनिक्स होनगा संघाने अनेक आक्रमक चढाया केल्या. पण चिंचलीच्या बचावफळीने त्या अपयशी ठरवल्या. खेळ संपण्यास 1 मिनिट बाकी असताना आदित्य केंचण्णावरच्या पासवर पलाश मेळगीमनीने गोल करून 1-4 अशी आघाडी कमी केली. शेवटी हा सामना रिवरसाईड चिंचली संघाने जिंकला. तिसऱया क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात कनक मेमोरियल नेहरूनगर संघाने अमोघ रायबाग संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. कनकतर्फे महांतेश हिरेकुरबरने गोल केला.
बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे सार्वजनिक शिक्षण खात्याचे जिल्हा क्रीडाधिकारी डी. एस. डिग्रेज, विवेकराव पाटील, लक्ष्मीकांत देसाई, केएमएफचे अधिकारी जयानंद, राजु कोरे, महादेव दरमट्टी, जे. टी. पाटील, आनंद शिंदे, संजू सौदलगी, सुनील चौधरी, कलमेश्वर, विद्या वग्गण्णावर, विश्वनाथ पाटील, राजू बनगे, नवीन पट्टीकेरी यांच्या हस्ते विजेत्या रिवरसाईड, उपविजेत्या फिनिक्स होनगा व तिसरा क्रमांक पटकाविलेल्या कनक मेमोरियल संघांना चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक श्रीराम (अमोघ), उत्कृष्ट बचावपटू अमित गट्टे (हारुगीरी), उत्कृष्ट खेळाडू प्रज्वल हांडगे (चिंचली), उगवता खेळाडु आदित्य केंचण्णावर (होनगा), शिस्तबद्ध संघ वसंतराव पाटील (जलालपूर) यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. नईम अरळीकट्टी, डी. वाय. नंदिहाळ, दिग्विजय शिंदे, राहुल हारुगे, एम. आर. खडकगोळ यांनी पंचांचे काम पाहिले.