वृत्तसंस्था /पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव पाटण्यात दाखल होताच राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती आणि पक्षाचे वरिष्ठ नेत फैयाज अहमद यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे. दोघेही शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
मीसा भारती यांच्या राज्यसभेतील कार्यकाळ समाप्त होणार आहे. राजदच्या वतीने त्या दुसऱयांदा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाणार आहेत. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे बिहारमधील जातीय जनगणनेच्या मागणीदरम्यान राज्यात परतले आहेत. चारा घोटाळय़ाप्रकरणी मागील महिन्यातच त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. तर संयुक्त जनता दलाच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांबद्दल अद्याप गूढ कायम आहे. केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांना संजद पुन्हा राज्यसभेवर पाठविणार की नाही याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.