डिंपल यादव यांना उमेदवारी नाही : अखिलेश यांच्या पक्षाकडून संधी
वृत्तसंस्था /लखनौ
राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशातून समाजवादी पक्षाने तिसऱया उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांना उमेदवारी न देता राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली आहे. सपने यापूर्वी दोन उमेदवारांची घोषणा केली होती. राज्यसभेच्या उत्तरप्रदेशसाठीच्या 11 जागा रिक्त होणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता समाजवादी पक्षाला 3 जागांवर यश मिळणार आहे.
सपने यापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते कपिल सिब्बल यांना उमेदवारी दिली आहे. सिब्बल यांना उमेदवारी मिळाल्याने अखिलेश यांचे काका रामगोपाल यादव नाराज झाल्याची चर्चा आहे. पक्षाबाहेरील व्यक्तीला राज्यसभेवर पाठविण्याच्या प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शविला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अखिलेश यांनी रामगोपाल यांचे निकटवर्तीय जावेद अली खान यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. सिब्बल आणि खान यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
तिसऱया जागेसाठी डिंपल यादव यांचे नाव चर्चेत होते. परंतु याचदरम्यान जयंत चौधरी नाराज असल्याचे समोर आले. यामुळे डिंपल यादव यांना बाजूला सारून अखिलेश यांनी जयंत यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अखिलेश आणि जयंत चौधरी यांच्यातील संवाद कमी झाला होता.
चौधरी चरण सिंह यांचे नातू 43 वर्षीय जयंत चौधरी हे 2009-14 दरम्यान मथुरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. मोदीलाटेत ते 2014 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अपयश पत्करावे लागले होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्यासोबत मिळून निवडणूक लढवूनही पश्चिम उत्तरप्रदेशात या आघाडीला फारसे यश मिळविता आले नव्हते.
डिंपल लढविणार पोटनिवडणूक
अखिलेश यांच्या पत्नी डिंपल आता लोकसभा निवडणूक लढवू शकतात. अखिलेश यादव यांनी राजीनामा दिल्याने आझमगड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आझमगडसोबत रामपूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. आझम खान हे पत्नी तंजीन फात्मा यांना रामपूर मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे करण्याच्या तयारीत आहेत.