बसुर्ते क्रॉस-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, वाहनधारक संतप्त
प्रतिनिधी /बेळगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसुर्ते क्रॉस ते महाराष्ट्र सीमा हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. याबाबत कित्येकवेळा तक्रार करुनही लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कर्नाटकातून महाराष्ट्राला जोडणाऱया या मार्गाची बिकट अवस्था झाली आहे. मध्यंतरी उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉसपर्यंत डांबरीकरण केले आहे. मात्र बसुर्ते क्रॉस ते महाराष्ट्र सीमा हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने दोन्ही राज्यांच्या वाहनधारकांना खडय़ातूनच मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान पावसामुळे रस्त्यावर डबकी निर्माण झाली आहेत. परिणामी रात्रीच्या अंधारात किरकोळ अपघात घडत आहेत. महाराष्ट्र हद्दीतील रस्ता सुरळीत असला तरी कर्नाटक हद्दीतील 3 कि. मी. च्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सीमा हद्दीतील रस्ता… नको रे बाबा अशी प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त होत आहेत.
वाहने चालविणे बनले धोक्याचे
या मार्गावरून कोवाड परिसरासह आजरा, नेसरी, गडहिंग्लज आदी भागातील प्रवाशांची सतत रहदारी असते. शिवाय शाळा, महाविद्यालयीन शिक्षण, बाजार आणि वैद्यकीय उपचारासाठी बेळगावला येणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहने चालविणे धोक्मयाचे बनले आहे. परिणामी वाहने नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. मध्यंतरी केवळ पॅचवर्क करून वेळ मारून नेण्यात आली होती. पण, पावसामुळे पॅचवर्क केलेले खड्डे देखील उखडून गेले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे त्रासाचे बनले
आहे.
केवळ पॅचवर्क
बसुर्ते क्रॉस ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्ता डांबरीकरण करण्याऐवजी केवळ पॅचवर्क करून नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक केली जात आहे. निवडणूक जवळ आली की, लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडतो. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना वाहने चालविताना धक्के खातच प्रवास करावा लागतो.
अन्यथा रास्ता रोको


सीमा हद्दीवरील मार्गावर बसुर्ते क्रॉस ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून केवळ पॅचवर्क करून खड्डे बुजविले जात आहेत. मात्र काही दिवसातच पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे फटका बसत आहे. तातडीने डांबरीकरण करावे अन्यथा रास्ता रोको करणार आहे.
– परशराम भातकांडे (माजी ग्राम. पं. सदस्य)