रस्त्यावर एका बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे शेतकरी आक्रमक : बुडा-पोलीस खात्यानेही हात झटकल्याने 60 फूट रस्त्याचा प्रश्न अधांतरीच
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगरपर्यंतचा रस्ता 60 फूट करण्याचा ग्रा. पं. ने घेतलेला निर्णय योग्य आहे. या रस्त्यासाठी शेतकरी वर्गानेही आपली जमीन देण्यास सहकार्य केले आहे. परंतु एका बाजूने प्लॉट व्यावसायिकांकडून रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन रास्तारोको केला. परंतु घटनास्थळी आलेल्या बुडा अधिकारी व पोलीस खात्यानेही हात झटकल्यामुळे 60 फूट रस्त्याचा प्रश्न तसाच राहिला. शेतकरी बंधूंनी मात्र दोन्ही बाजूची अर्धी जागा घेऊन रस्ता करण्यास आपली हरकत नसल्याचे बुडा अधिकारी व पोलीस खात्याला सांगितले. शेवटी ग्रा. पं. पीडीओ यांनी काम थांबवून प्लॉट व्यावसायिकांना नोटीस पाठविणार असल्याचे शेतकरी वर्गाला सांगितले.
कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 28 हजारच्या घरात आहे. यामुळे गावात चारचाकी, दुचाकी वाहने अधिक आहेत. तसेच या रस्त्यावरून शाहूनगरमार्गे व केएलई हॉस्पिटलमार्गे दोन्हीकडून बसेस धावतात. या रहदारीमुळे सध्याचा रस्ता अरुंद होत असल्यामुळे मागील वर्षी ग्रा. पं. ने सदर रस्ता 60 फूट बनविण्याचा निर्णय घेऊन रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 30 फूट शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन 60 फूट रस्त्याचे मार्किंग करण्यात आले. परंतु सदर रस्त्याच्या एका बाजूला प्लॉट व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे 60 फुटी रस्त्याचा तिढा कायम राहिला असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले.
बुडा-पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर या 60 फुटी रस्त्यावर एका बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे दुसऱ्या बाजूचे शेतकरी आक्रमक होऊन रास्तारोको केल्यामुळे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुडा कार्यालयाचे अधिकारी ए. एस. कांबळे व काकती पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ दुडगुंद घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी वर्ग व प्लॉट व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बुडा अधिकारी कांबळे यांना तुम्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सर्व्हे करतेवेळी कोणतीही नोटीस पाठवता, सदर रस्ता आमच्या शेतातून घालून परवानगी कशी दिली म्हणून चांगलेच धारेवर धरले. तर प्लॉट व्यावसायिक मल्लप्पा पाटील म्हणाले, आम्ही बुडा ऑफिसकडून रितसर रस्त्याची आखणी करूनच परवानगी घेतलेली आहे. परत जर बुडा ऑफिसकडून रस्त्यासाठी जागा सोडण्यासाठी आम्हाला आदेश आल्यास आम्ही शेतकरी वर्गाचे नुकसान करणार नाही, त्यांना सहकार्य करू, असे सांगितले.
रस्त्यासाठी विनामोबदला जमीन
ग्रा. पं. ने 60 फूट रस्ता करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. यापूर्वीही या रस्त्यामध्ये आमच्या जमिनी गेल्या आहेत. परंतु 60 फूट रस्ता करण्यासाठी आताही आम्ही विना मोबदला जमीन देऊन सहकार्य करत आहोत. परंतु यामध्ये दोन्ही बाजूने रस्त्याच्या मध्यापासून 30 फूट जमीन घेऊन 60 फूट रस्ता तयार करण्यास आमची काहीच हरकत नाही, असे शेतकरी सुभाष हुद्दार, महादेव भुजंग पाटील, भिमाजी पाटील, महादेव शटुप्पा पाटील, यल्लाप्पा नारायण पाटील यांनी सांगितले.
ग्रा. पं. ने रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान ग्रा. पं. ने बुडा कार्यालय, सर्व्हे कार्यालय तसेच प्लॉट व्यावसायिक यांच्या नजरेला दाखवून द्यावे. गावच्या मुख्य रस्त्यासाठी विनामोबदला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात आली.
रास्तारोकोमुळे प्रवाशांची कुचंबणा
रास्तारोकोमुळे सदर रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची कुचंबणा झाली. तसेच या मार्गावर धावणारी बस वाहतूकही ठप्प झाल्यामुळे प्रवासी वर्गाची तारांबळ उडाली. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पुनम पाटील, ग्रा. पं. सदस्या भारता पाटील, ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, जयराम पाटील, अनिल पावशे, मल्लेशी बुडेनूर, बाबू दोडमनी, बंदेनवाज सय्यद, सुरेश राठोड, उमेश पाटील, नवनाथ पुजारीसह अनेक शेतकरी उपस्थित होते.