डॉ. दिव्या राणे यांचे आश्वासन
प्रतिनिधी /वाळपई
भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अनसोळे गावातील प्रलंबित रस्त्याचे डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रचारावेळी मतदारांना दिलेले वचन पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत आहे. पर्ये मतदारसंघातील इतर पंचायत क्षेत्रातील प्रलंबित असलेली रस्त्यांची कामे देखील लवकरच पूर्ण होतील, असे आश्वासन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अनसोळे या गावांमध्ये जाणाऱया रस्त्याचे डांबरीकरण कामाचा प्रारंभ श्रीफ्ढळ वाढवून केल्यानंतर आमदार डॉ. दिव्या राणे बोलत होत्या. यावेळी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्या राजेश्री काळे, भिरोंडा सरपंच आद्राद तेरेजा, स्थानिक पंच समीर बागी, पंच उदयसिंह राणे, सदा गावकर, बाबू हुमाणे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
हा रस्ता केला जात नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यावेळी आमदार विश्वजीत राणे यांनी हस्तक्षेप करून रस्त्यांची डागडुजी करून दिली होती व नंतर रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती.
सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामावर सुमारे 90 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे तांत्रिक अधिकारी अरविंद सावईकर यांनी सांगितले.