रेल्वे खात्याची डोकेदुखी संपली : वाहनधारकांच्या नशिबी मात्र अडचणीच, महापालिका-रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष, समस्यांचे निवारण करण्याची नागरिकांची मागणी


प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेफाटकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. मात्र उड्डाणपुलाच्या देखरेखीसह सर्व्हिस रस्त्यावर निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.


रेल्वेफाटक बंद झाल्यानंतर याठिकाणी रहदारी कोंडी निर्माण होत होती. तसेच अपघाताच्या घटना घडत होत्या. काहीवेळा रहदारी कोंडीचा फटका रेल्वे वाहतुकीलादेखील बसत होता. प्रत्येक रेल्वेफाटकावर रेल्वेचा वेग कमी करावा लागत असल्याने भरपूर वेळ वाया जात होता. होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे.
मात्र उड्डाणपुलांची उभारणी केल्यानंतर आपली जबाबदारी संपली अशी भूमिका रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने घेतली आहे. पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कपिलेश्वर रोडवर उड्डाणपुलाची उभारणी केल्यानंतर शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे पुलाशेजारील सर्व्हिस रस्त्याचा विकास झाला नसल्याने परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील पहिला उड्डाणपूल असून कपिलेश्वर उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. पण उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना समस्या निर्माण झाली आहे. तसेच शनिमंदिरजवळ उड्डाणपुलावर रस्ता खचल्याने खड्डा निर्माण झाला आहे. त्याठिकाणी दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून अन्य वाहनांनादेखील याचा फटका बसत आहे. खड्डय़ात वाहन गेल्याने वाहनचालक थोडेफार विचलित होत असल्याने समोरून येणाऱया वाहनांना धडक देण्याची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
सर्व्हिस रस्त्यांच्या विकासाकडे मनपा-रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा
शहरात धारवाड रोड हा शहरातील दुसरा उड्डाणपूल असून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर आणि आजूबाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. उन्हाळय़ात जास्त समस्या निर्माण होत नाहीत. पण पावसाळय़ात सर्व्हिस रस्त्यावरून चालत जाणेदेखील कठीण बनले आहे. रुपाली थिएटरच्या समोर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर मोठी चर निर्माण झाली असून याठिकाणी वाहने आपटत आहेत. तर दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चर असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत.
उड्डाणपुलावरील पथदीप बंद
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण केलेल्या उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यांची समस्या सोडविण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. एका बाजूला नाला असल्याने नाल्यामध्ये कचरा साचून पावसाचे पाणी येथील दुकानांमध्ये शिरत आहे. तसेच या रस्त्यावरून पायी चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. काही ठिकाणी नाल्याचे चेंबर उघडे असल्याने वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. पुलाच्या दुसऱया बाजूचा काँक्रिटचा रस्ता पूर्णपणे उखडला असून काहीठिकाणी सळय़ा वर आल्या आहेत. सध्या या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून पाण्यामधूनच ये-जा करावी लागत आहे. परिणामी उखडलेल्या सळय़ा वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत. तसेच गोगटे चौकातील बसवेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप बंद असून पथदीप सुरू ठेवण्यासाठी सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. मात्र महापालिका आणि कॅन्टोन्मेंटच्या वादात बसवेश्वर उड्डाणपूल अंधाराच्या विळख्यात सापडला आहे.
तिसरे रेल्वेफाटक येथे चौथ्या उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे. हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात अडकला असून येथील व्यावसायिक आणि वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. मात्र शेजारी असलेला रस्ता अवजड वाहने आणि उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी वापरलेल्या यंत्रोपकरणामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. उड्डाणपुलाच्या शेजारील रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून पावसाचे पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. अनर्थ घडण्यापूर्वी येथील समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे.
तक्रार कुणाकडे करायची…
शहरातील उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांचे निवारण झाले. पण वाहनधारक आणि रहिवाशांच्या समस्या जैसे थे आहेत. केवळ रेल्वे प्रशासनाने आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडली. पण सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांच्या निवारणाकडे कानाडोळा केला आहे. महापालिका प्रशासनानेदेखील या समस्यांकडे दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधीदेखील येथील समस्यांकडे दाद देत नाहीत. त्यामुळे या समस्यांचे निवारण करण्यासाठी कुणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी शहरातील सर्व उड्डाणपुलांच्या परिसरात निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.