पाकिस्तानातून रॉकेट लाँचर आल्याचा पोलिसांचा दावा
वृत्तसंस्था/ चंदीगढ
पंजाबमधील तरणतारण जिल्हय़ातील सरहाली पोलीस ठाण्यावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे अग्निबाणाने हल्ला करण्यात आला आहे. हा अग्निबाण आणि रॉकेट लाँचर पाकिस्तानातून आल्याचा दावा डीजीपी गौरव यादव यांनी केला असून चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. या रॉकेट लाँचरचा उपयोग पाकिस्तानच्या लष्कराकडून केला जातो. त्यामुळे तो पाकिस्तानातून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले.
या रॉकेट हल्ल्यामुळे पंजाबमध्ये गोंधळ उडाला असून खलिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा होत आहे. बऱयाच वर्षानंतर अशा प्रकारे पोलीस ठाण्यावर अग्निबाण हल्ला झाल्याने प्रशासनावर टीका होत आहे. पंजाब सरकारने भविष्य काळात असे हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला असून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
पोलीस ठाणे केले सील
या घटनेनंतर त्वरित संबंधित पोलीस ठाण्याला सील ठोकण्यात आले. आसपासच्या परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याने घेतली असल्याने हल्ल्याचे खलिस्तान कनेक्शन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास प्रारंभ केला आहे. या घटनेत जो अग्निबाण पोलीस ठाण्यावर फेकण्यात आला तो सुदैवाने फुटला नाही. त्यामुळे हानी टळली आहे.