16 मार्चपासून सीरिज होणार स्ट्रीम
भारताला विज्ञानाच्या जगतात जमिनीपासून आकाशापर्यंत भरारी घेण्याचे सामर्थ्य प्रदान करणारे होमी जहांगीर भाभा आणि विक्रम साराभाई यांची कहाणी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 मध्ये ‘रॉकेट बॉयज’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती आणि याला मोठी पसंती मिळाली होती. आता याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. रॉकेट बॉयज 2 मध्ये देशाला पहिल्या आण्विक चाचणीसाठी किती परिश्रम करावे लागले होते हे दाखविण्यात आले आहे. देशाच्या मौनाला शत्रूंनी कशाप्रकारे कमकुवतपणा मानला होता आणि या आण्विक चाचणीने भारत कुणापेक्षा कमी नसल्याचे जगाला दाखवून दिल्याचे या सीरिजमधून दर्शविले जाणार आहे.
युद्धाच्या जागतिक धोक्यांदरम्यान भारतासाठी आण्विक राष्ट्र होणे किती आवश्यक होते आणि यानंतरच भारताची पहिली आण्विक चाचणी पार पाडल्याचे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या सीरिजमध्ये देशाच्या महान वैज्ञानिकांचा अविश्वसनीय प्रवास दर्शविला जाणार आहे. या वैज्ञानिकांनी एका नव्या युगाला आकार दिल्याने कुणाचीच भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत झाली नसल्याचे सीरिजमध्ये पाहता येणार आहे. रॉकेट बॉयज 2 ही वेबसीरिज प्रेक्षकांना सोनी लिव्ह ऍपवर पाहता येणार आहे. ही सीरिज 16 मार्च रोजी स्ट्रीम होणार आहे. हिंदी भाषेतील या बायोग्राफिकल वेबसीरिजमध्ये होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची कहाणी दर्शविण्यात आली आहे. याचे दिग्दर्शन अभय पन्नूने केले आहे. यात इश्वाक सिंह आणि जिम सरभने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याचबरोबर रेजिना कॅसांड्रा, सबा आझाद, रजत कपूर, दिव्येंदु भट्टाचार्य तसेच अर्जुन राधाकृष्ण हे कलाकार दिसून येणार आहेत.