पुरुषांच्या टेनिसमध्ये 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱया दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीची सांगता, सोशल मीडियावरुन निर्णयाची घोषणा
वृत्तसंस्था /लंडन
सातत्याने गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागत असलेल्या स्विस टेनिसपटू रॉजर फेडररने गुरुवारी आंतरराष्ट्रीय टेनिस वर्तुळातून निवृत्ती जाहीर केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत फेडररने 20 ग्रँडस्लॅम टायटल्स संपादन केले असून 5 हंगामात तो अव्वलस्थानी विराजमान होता. प्रतिस्पर्धी राफेल नदाल व नोव्हॅक जोकोविचसह त्याची जुगलबंदी सातत्याने रंगत राहिली.
फेडररने सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला. 23 वेळा मेजर चॅम्पियन राहिलेली सेरेना विल्यम्स हिने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर करुन आठवडाभराचा कालावधी होतो न होतो, तोच आता फेडररने देखील आपल्या कारकिर्दीची सांगता केली.
‘मागील 3 वर्षांच्या कालावधीत मला सातत्याने विविध दुखापती व शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले, हे आपण जाणताच. व्यावसायिक टेनिसमध्ये पूर्ण ताकदीने खेळत राहण्यासाठी मी सातत्याने प्रचंड मेहनत घेतली. पण, मला माझ्या शरीराच्या मर्यादा ज्ञात आहेत आणि मी आणखी खेळू नये, असाच सध्याचा संदेश आहे’, असे फेडरर ट्वीटरवर म्हणाला.
जागतिक टेनिसमधील या दिग्गज खेळाडूने जुलै 2021 मध्ये विम्बल्डननंतर एकही व्यावसायिक स्पर्धा खेळलेली नाही. त्यामुळे, त्याच्या निवृत्तीच्या निर्णयात आश्चर्याचे काहीही नाही. मात्र, यंदा जुलै महिन्यात ऑल इंग्लंड क्लबवरील सेंटर कोर्टच्या शताब्दीनिमित्त आयोजित सोहळय़ाला तो आवर्जून हजर राहिला होता. ऑक्टोबरमध्ये मायदेशातच होणाऱया स्विस इनडोअर ओपन स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याचा इरादा त्याने यापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, आता त्याने लंडनमध्ये पुढील आठवडय़ापासून खेळवल्या जाणाऱया लेव्हर कप स्पर्धेत आपण सहभागी होत असल्याचे जाहीर केले. त्याची मॅनेजमेंट कंपनीच सांघिक स्तरावरील ही स्पर्धा चालवते.
फेडररची पत्नी मिर्का ही देखील पूर्वाश्रमीची टेनिसपटू राहिली असून फेडरर व मिर्का ऍथलिट्स म्हणून ऑलिम्पिकमध्ये परस्परांना भेटले होते. विवाहापूर्वी ही त्यांची पहिलीच भेट होती. फेडरर-मिर्काला जुळेरत्न आहे. फेडररने 103 टूर लेवल टायटल्स जिंकले असून यादरम्यान 1251 एकेरी सामन्यांमध्ये विजयश्री संपादन केली आहे. सर्वाधिक सामने जिंकणाऱया सर्वकालीन खेळाडूंच्या यादीत तो दुसऱया स्थानी विराजमान आहे.
सर्वाय वयस्कर अव्वल खेळाडू
रॉजर फेडररने आपल्या उमेदीच्या कालावधीत बऱयाच विक्रमांवर आपले नाव कोरले असून एटीपी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान होणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनवर पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते. सर्व्हिंग, फोरहँड, फूटवर्क, ऍटॅकिंग स्टाईल खेळामुळे तो जागतिक टेनिसमध्ये उत्तम वर्चस्व गाजवू शकला. फेडररने आजवर विम्बल्डनमध्ये 8, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 6, अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये 5 व प्रेंच ग्रँडस्लॅममध्ये 1 जेतेपद मिळवले. सध्या सर्वाधिक स्लॅम जिंकण्याच्या निकषावर नदाल 22 जेतेपदासह पुढे आहे. फेडररचा यापूर्वीचा शेवटचा सामना दि. 7 जुलै 2021 रोजी खेळवला गेला. सेंटर कोर्टवर विम्बल्डन उपांत्यपूर्व लढतीत त्याला हय़ुबर्ट हुरकाझविरुद्ध 6-3, 7-6 (4), 6-0 असा पराभव पत्करावा लागला होता.