Tarun Bharat

‘फ्लॅट’ नव्हे ‘डिटेंशन सेंटर’मध्ये रोहिंग्या

Advertisements

केंद्रीय मंत्री पुरी यांच्या विधानावर वाद ः गृह मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

रोहिंग्या शरणार्थींना वसविण्याप्रकरणी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मोठा वाद उभा ठाकल्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. रोहिंग्या शरणार्थी डिटेंशन सेंटर्समध्येच राहतील, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी हरदीप पुरी यांनी रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील ईडब्ल्यूएस फ्लॅट्समध्ये स्थलांतरित केले जाणार असल्याचे म्हटले होते.

रोहिंग्या घुसखोरांना नवी दिल्लीतील बक्करवाला येथील ईडब्ल्यूएस फ्लॅट्समध्ये ठेवण्याचा कुठलाच निर्देश दिलेला नाही. रोहिंग्यांना नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, असा प्रस्ताव दिल्ली सरकारने दिला होता. रोहिंग्यांना सध्याचे ठिकाण कंचन कुंजमध्ये (मदनपूर खादर) ठेवण्यात यावे, असा निर्देश दिल्ली सरकारला देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. दिल्लीत सुमारे 1,100 रोहिंग्यांचे वास्तव्य असून त्यांच्याकरता तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. या तंबूंकरता महिन्याकाठी 7 लाख रुपयांचे भाडे सरकार देत आहे.

विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून सरकार अवैध घुसखोरांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. याचमुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यात यावे, असा निर्देश देण्यात आला आहे. रोहिंग्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठविण्यात येईपर्यंत डिटेंशन सेंटर्समध्येच ठेवण्यात येईल. परंतु दिल्ली सरकारने सध्याच्या त्यांच्या वास्तव्यठिकाणाला डिटेंशन सेंटर घोषित केलेले नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

हरदीप पुरी यांचा ट्विट

रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या ट्विटनंतर चर्चेत आला आहे. देशात शरण मागितलेल्या लोकांचे भारत नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्व रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीच्या बक्करवाला भागात ईडब्ल्यूएस फ्लॅट्समध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्यांना मूलभूत सुविधा, युएनएचआरसी ओळखपक्ष तसेच दिल्ली पोलिसांची सुरक्षा प्रदान केली जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली आहे.

आम आदमी पक्षाकडून टीका

पुरी यांच्या ट्विटनंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर भाजपच्या काही नेत्यांनीही पुरी यांच्या ट्विटप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्व हिंदू परिषद तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नाराज झाल्याचे सांगण्यात आले आहे. या नाराजीनंतरच केंद्र सरकारने डिटेंशन सेंटरबद्दलचे स्पष्टीकरण दिल्याचे मानले जात आहे. देशात रोहिंग्यांना आणणारा आणि वसविणारा भाजपच आहे. देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड करण्याच्या भाजपच्या एक मोठय़ा कटाचा पर्दाफाश झाला असल्याचा आरोप आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

रोहिंग्या मुस्लीम कोण?

रोहिंग्या मुस्लीम हे मूळचे म्यानमारचे रहिवासी आहेत. 1982 नंतर बौद्धबहुल म्यानमारने रोहिंग्यांचे नागरिकत्व काढून घेतले होते. तसेच रोहिंग्यांना शिक्षण, सरकारी नोकरी तसेच अनेक अधिकारांपासून बेदखल केले होते. 2017 मध्ये झालेल्या नरसंहारापूर्वी म्यानमारमध्ये रोहिंग्यांची संख्या सुमारे 14 लाख इतकी होती. परंतु त्यानंतर म्यानमारमधून 9 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी पलायन करत बांगलादेश, भारतासह अन्य काही देशांमध्ये धाव घेतली आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारतात 18 हजार रोहिंग्या मुस्लीम वास्तव्य करत असल्याचे गृह मंत्रालयाने युएनएचआरसीचा दाखला देत सांगितले होते. हा आकडा प्रत्यक्षात याहून खूपच अधिक असण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हैदराबाद, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मणिपूरमध्ये या रोहिंग्यांचे वास्तव्य आहे.

Related Stories

नव्या बाधितांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p

खराब हवामानामुळे पुन्हा अमरनाथ यात्रेला ब्रेक

Patil_p

पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Tousif Mujawar

देशात 24 तासात 9983 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दिल्ली : आयजीआय विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

शांती-समृद्धीसाठी प्रार्थना करा!

Patil_p
error: Content is protected !!