विश्वभारती कला क्रीडा प्रतिष्ठानवतीने आयोजन : पन्नासहून अधिक कुस्त्या निकाली झाल्याने शौकीन खुष
वार्ताहर /खानापूर
चापगाव (ता. खानापूर) येथे विश्वभारती कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत रोहित पाटील कंग्राळी याने कुबेर पैलवान पिरनवाडी यांच्यावर एकेरी कस डावावर विजय मिळविला. ही कुस्ती शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून एकलव्य पुरस्कार विजेत्या स्मिता पाटील यांनी काम पाहिले.
आखाडय़ाचे पूजन 105 वर्षे वयाचे जिवाप्पा पवार (माजी पैलवान, राजहंसगड) यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वभारती कला क्रीडा प्रतिष्ठानचे अनिल देसाई, दामोदर कणबरकर, महादेव पाटील, एल. डी. पाटील, विनोद गुरव, भुजंग कामती, डुमिंग नाजरेत, रामाका हणबर, कृष्णाजी झेंडे, पांडुरंग कुराडे, मऱयाप्पा पाटील, म. ए. समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, ग्रा. पं. सदस्य मारुती चोपडे, नागराज यळ्ळूरकर, रमेश धबाले, बाबू घार्शी, आपचे भैरू पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील विरुद्ध कुबेर पिरनवाडी यांच्यात सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी लावण्यात आली. सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी पंजाची पकड सुरू करून एकमेकांवर डाव साधत ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. कुबेर याने रोहित पाटीलवर अनेक वेळा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु रोहितने खेमी डावाची पकड घेऊन कुबेरला खाली खेचले. त्यानंतर दस्ती लावून आखडी लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी एकेरी कस टाकून रोहितने दहाव्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला.
या आखाडय़ात करण पिंगट खादरवाडी, शुभम चौगुले मच्छे, शंकर तीर्थकुंडे, जानोबा काशिलकर बंकी, प्रज्वल पाटील मच्छे, महेश तीर्थकुंडे, निरंजन चव्हाण हिंडलगा, श्रेयस पाटील कंग्राळी, प्रवीण माळवी, विकास कुराडे चापगाव, हरि नेसरकर खादरवाडी, स्वप्निल सुतार सावगाव, मोहित चौगुले कंग्राळी, पार्थ तीर्थकुंडे, प्रज्वल संतिबस्तवाड, अरिहंत पाटील मच्छे, नागराज संतिबस्तवाड, संदीप धबाले चापगाव आदी पैलवानांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
पंच म्हणून कुस्ती संघटनेचे पांडुरंग पाटील, हणमंत गुरव, पुंडलिक कुराडे, जयवंत खानापूरकर आदींनी काम पाहिले. समालोचन सुकुमार माळी (इचलकरंजी) यांनी केले. कुस्ती आखाडा पाहण्यासाठी अनेक कुस्तीशौकीन उपस्थित होते. यावेळी चार महिला कुस्तीपटू उपस्थित होत्या.