आयपीएलमध्ये पाचशे चौकारांचा टप्पा गाठणारा पाचवा फलंदाज
वृत्तसंस्था /पुणे
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा टी-20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहलीनंतर भारताचा दुसरा क्रिकेटपटू बनला आहे.
भारताचा व मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितने बुधवारी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या लढतीत हा माईलस्टोन गाठला. रोहितने आता 10003 धावा जमविल्या असून दहा हजारहून अधिक धावा करणारा तो जगातील एकूण सातवा फलंदाज आहे. रबाडाने टाकलेल्या चौथ्या षटकातील तिसऱया चेंडूवर षटकार ठोकत त्याने हा माईलस्टोन गाठला. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. विंडीजचा महान सलामीवीर ख्रिस गेल दस हजारीच्या यादीत अव्वल स्थानावर असून त्याने 14562 धावा जमविल्या आहेत. पाकचा शोएब मलिक (11698), विंडीजचा केरॉन पोलार्ड (11474), ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच (10499), भारताचा विराट कोहली (10379) व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (10373) यांचा त्यानंतर क्रमांक लागतो.
रोहितचा आणखी एक माईलस्टोन
रोहितने या सामन्यावेळी आणखी एक माईलस्टोन गाठला असून त्याने आयपीएलमध्ये 500 चौकारांचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा तो पाचवा फलंदाज आहे. त्याने या सामन्यात दोन माईलस्टोन गाठले असले तरी त्याच्या संघाला या सामन्यात विजय मिळू शकला नाही. पंजाबकडून त्यांना 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.