विश्वचषक स्पर्धा : घानावर 3-2 फरकाने विजय
वृत्तसंस्था /कतार
विश्वचषक स्पर्धेतील गट एच मधील सामन्यात पोर्तुगालने लौकिकाला साजेसा खेळ करीत घानावर 3-2 अशा गोलफरकाने मात करीत चाहत्यांना खुश केले. स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा पहिला गोल नोंदवून पोर्तुगालच्या विजयाचा पाया रचला. पाच विश्वचषक स्पर्धेत गोल नोंदवणारा तो पहिला फुटबॉलपटू बनला आहे.
स्टेडियम 974 वरील या सामन्याच्या पूर्वार्धात रोनाल्डोने दोन संधी वाया घालविल्यानंतर उत्तरार्धात 65 व्या मिनिटाला पेनल्टीवर संघाचा पहिला गोल नोंदवला. त्याच्यासाठी हा ऐतिहासिक गोल ठरला. विश्वचषक स्पर्धांतील त्याचा हा एकूण आठवा आणि 118 वा आंतरराष्ट्रीय गोल होता. घानाच्या बॉक्स क्षेत्रात मोहम्मद सालिसूने रोनाल्डोला पाडल्यामुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली होती. रोनाल्डोने याआधी चार विश्वचषकात गोल नोंदवणाऱया पेले, उवी सीलेर, मिरोस्लाव क्लोस यांच्याशी बरोबरी केली होती. या पाचव्या स्पर्धेत त्याने या तिघांना मागे टाकत नवा विक्रम नोंदवला.
2006 मध्ये त्याने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धेत त्याने गोल नोंदवले. 2010 दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत एक, 2014 ब्राझील स्पर्धेत एक, 2018 रशियातील स्पर्धेत 4 गोल त्याने नोंदवले. महिलांमध्ये ब्राझीलच्या मार्टाने पाच महिला विश्वचषकात गोल नोंदवले आहेत. रोनाल्डो हा विश्वचषकात गोल नोंदवणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडूही बनला आहे. तो सध्या 37 वर्षे 292 दिवसांचा आहे. कॅमेरूनच्या रॉजर मिलाने 1994 मधील स्पर्धेत गोल नोंदवत सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्यावेळी तो 42 वर्षे 39 दिवसांचा होता.
या सामन्यात सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांतच रोनाल्डोच्या दोन संधी हुकल्या. पण या सत्रात पोर्तुगालनेच वर्चस्व राखले होते. मात्र घानाचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला होता. उत्तरार्धात 60 व्या मिनिटानंतर खऱया ऍक्शनला सुरुवात झाली. 65 व्या मिनिटाला पोर्तुगालला रोनाल्डोने आघाडी मिळवून दिल्यानंतर आंद्रे अयेवने 73 व्या मिनिटाला घानाला बरोबरी साधून दिली. पण यानंतर दोन मिनिटांच्या फरकाने दोन गोल नोंदवून पोर्तुगालने 3-1 अशी आघाडी घेतली. 78 व्या मिनिटाला जोआव फेलिक्सने पुढे सरसावणारा घानाचा कीपर ऍटि झिगीच्या वरून चेंडू जाळय़ात टोलवत संघाचा दुसरा गोल नोंदवला. यासाठी फर्नांडिसने त्याला उजीवकडून चेंडू पुरविला होता. दोनच मिनिटांनी बदली खेळाडू राफेल लीओने ही आघाडी 3-1 अशी केली. बुनो फर्नांडिसने दिलेल्या थ्रू पासवर ताबा घेत त्याने हा गोल नोंदवला. निर्धारित वेळ संपण्यास एक मिनिट असताना उस्मान बुकारीने डावीकडून मिळालेल्या क्रॉसला हेडरवर जाळय़ाची दिशा देत घानाचा दुसरा गोल नोंदवून पोर्तुगालची आघाडी कमी केली. 9 मिनिटांच्या नर्व्हस स्टॉपेज टाईमध्ये ही आघाडी कायम राखत पोर्तुगालने या विश्वचषक मोहिमेचा विजयी प्रारंभ केला.
या सामन्यात पोर्तुगालने गोलच्या दिशेने 11 तर घानाने 9 शॉट्स मारले. पोर्तुगालकडे 62 टक्के तर घानाकडे 38 टक्के बॉल पझेशन होते. यावरून पोर्तुगालचे वर्चस्व दिसून येते. पास देण्याची अचूकता (88 व 81 टक्के) मात्र दोघांत जवळपास सारखीच होती. पोर्तुगालकडून 14 तर घानाकडून 19 फाऊल्स झाले आणि पोर्तुगालच्या दोघांना व घानाच्या चौघांना पिवळे कार्ड मिळाले. रेड कार्ड मात्र कोणालाही मिळाले नाही. दोघांनाही प्रत्येकी 3 कॉर्नर्स मिळाले होते. पोर्तुगाल आता गटात 3 गुणांसह आघाडीवर असून त्यांचा पुढील सामना सोमवारी उरुग्वेविरुद्ध होणार आहे.