विजयासाठी 378 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची 3 बाद 259 धावांपर्यंत मजल
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
येथील पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात 378 धावांचे तगडे आव्हान देऊन निर्धास्त झालेल्या भारताविरुद्ध जो रुट (नाबाद 76) व जॉनी बेअरस्टो (नाबाद 72) यांनी धडाकेबाज फलंदाजी साकारत मैदानी विजय खेचून आणण्याच्या दिशेने जोरदार घोडदौड साकारली. या उभयतांनी चौथ्या गडय़ासाठी 150 धावांची अभेद्य भागीदारी साकारत भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा प्रकर्षाने चव्हाटय़ावर आणल्या.
या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी इंग्लंडला आणखी 119 धावांची तर भारताला इंग्लंडचे उर्वरित 7 फलंदाज गारद करण्याची गरज आहे.


इंग्लंडने विजयासाठी 378 धावांचा पाठलाग सुरु केल्यानंतर सलामीवीर ऍलेक्स लीस (65 चेंडूत 56) व झॅक क्राऊली (76 चेंडूत 46) यांनी 107 धावांची भरभक्कम सलामी साकारली. याचवेळी बुमराहने दोन धक्के दिल्याने व एक फलंदाज धावचीत झाल्याने इंग्लंडची बिनबाद 107 वरुन 3 बाद 109 अशी दैना उडाली. मात्र, याचवेळी रुट व बेअरस्टो यांनी 197 चेंडूत 150 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि संघाला विजयाच्या मार्गावर आणले.
येथील खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. पण, यानंतरही भारतीय गोलंदाज इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात किंचीतही यश मिळवू शकले नाहीत. त्यातच भारताने पसवरलेले बचावात्मक क्षेत्ररक्षण इंग्लिश फलंदाजांच्या जोरदार फटकेबाजीला जणू खतपाणी घालणारे ठरले. अद्याप स्टोक्स व सॅम बिलिंग्जसारखे फलंदाज क्रीझवर उतरणे बाकी असताना भारतीय संघ या कसोटीत बिकट स्थितीत आहे.
पुजाराचे 66 धावांचे योगदान
तत्पूर्वी, भारताच्या दुसऱया डावात चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 66 धावांचे योगदान दिले तर पहिल्या डावातील शतकवीर रिषभ पंतने 57 धावांची आतषबाजी केली. इंग्लिश संघातर्फे बेन स्टोक्स सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 33 धावांमध्येच 4 बळी घेतले. याशिवाय, स्टुअर्ट ब्रॉड व मॅटी पॉट्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सोमवारी चौथ्या दिवशी भारताने 3 बाद 125 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली होती.
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांची 78 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. भारताने सोमवारी 3 बाद 125 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली, त्यावेळी चेतेश्वर पुजारा 50 व रिषभ पंत 30 धावांवर क्रीझवर होते. या जोडीने त्यात आणखी 28 धावांची भर घातली. नंतर स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला बॅकवर्ड पॉईंटवरील ऍलेक्स लीसकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला उतरला. पुजारा बाद झाल्यानंतरही पंतने फलंदाजीतील उत्तम फॉर्म कायम राखला होता. पहिल्या डावात 146 धावा जमवल्यानंतर येथे दुसऱया डावातही त्याने दमदार अर्धशतक साजरे केले.
अय्यरने ब्रॉड व मॅटी पॉट्सना चौकारासाठी पिटाळून लावले. पण, नंतर 19 धावांवर पूलचा फटका फसल्यानंतर जेम्स अँडरसनने सोपा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. अष्टपैलू रविंद्र जडेजाकडून या लढतीत फटकेबाजीची अपेक्षा होती. पण, पंत 57 धावांवर बाद होणे भारताला धक्का देणारे ठरले. त्याने फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्लीपमधील जो रुटकडे सोपा झेल दिला. त्यानंतर शार्दुल ठाकुर देखील केवळ 4 धावांवर बाद झाला. भारताने यावेळी धावफलकावर 198 धावा असताना सातवा गडी गमावला होता. पुढे, शमी व जडेजा यांनी उर्वरित सत्रात आणखी पडझड होऊ दिली नाही.
विहारीने तो झेल घेतला असता तर…!
कारकिर्दीतील सर्वोच्च बहरात असलेल्या बेअरस्टोला हनुमा विहारीने दुसऱया स्लीपमध्ये दिलेले जीवदान भारतासाठी भलतेच महागडे ठरले. बेअरस्टो यावेळी 14 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेअरस्टो 39 धावांवर आणखी एक जीवदान लाभल्याने तेथेही सुदैवी ठरला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 416, इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 284. भारत दुसरा डाव ः 81.5 षटकात सर्वबाद 245 (चेतेश्वर पुजारा 168 चेंडूत 8 चौकारांसह 66, रिषभ पंत 86 चेंडूत 8 चौकारांसह 57, रविंद्र जडेजा 58 चेंडूत 1 चौकारासह 23. अवांतर 19. बेन स्टोक्स 33 धावात 4 बळी, ब्रॉड 2-58, पॉट्स 2-50).
इंग्लंड दुसरा डाव (टार्गेट 378) ः 57 षटकात 3 बाद 259 (रुट 112 चेंडूत नाबाद 76, बेअरस्टो 87 चेंडूत नाबाद 72. बुमराह 2-53)