पाचवी कसोटी जिंकत यजमान इंग्लंडची मालिकेत 2-2 ने बरोबरी
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
जॉनी बेअरस्टो (145 चेंडूत नाबाद 114) व जो रुट (173 चेंडूत नाबाद 142) या शतकवीरांच्या धडाकेबाज, अभेद्य भागीदारीच्या बळावर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा कठीण पाठलाग फॅशनेबल रितीने यशस्वी करण्याचा सिलसिला बर्मिंगहममध्ये भारताविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यातही कायम राखला आणि ही कसोटी 7 गडी राखून एकतर्फी जिंकत उभय संघातील 5 सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत राखली. वास्तविक, विजयासाठी 378 धावांचे तगडे आव्हान पार करणे अजिबात सोपे नव्हते. पण, बेअरस्टो व रुट यांची भक्कम तटबंदी केवळ अभेद्यच राहिली नाही तर त्यांनी इंग्लंडची नौका अगदी थाटात विजयाच्या पैलतीरीही नेली!
विजयासाठी चौथ्या डावात 378 धावांचे आव्हान असताना इंग्लंडने 76.4 षटकात 3 बाद 378 धावांसह एकतर्फी विजय खेचून आणला. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हा सलग चौथा धावांचा यशस्वी पाठलाग असून यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मागील मालिकेत त्यांनी सलग तीनवेळा 278, 299 व 296 धावांचे आव्हान पार केले आहे. चौथ्या डावात आजवरचे सर्वोच्च आव्हान दिले असले तरी त्याचेही संरक्षण करता आले नाही, हे मात्र भारताच्या दृष्टीने दुर्दैवी ठरले.
यापूर्वी, चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात हंगामी कर्णधार जसप्रित बुमराहने दोन धक्के देत इंग्लंडसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, बुमराहचा अपवाद वगळता अन्य सर्व भारतीय गोलंदाज सातत्याने निष्प्रभ ठरत गेले आणि इंग्लंडने सामन्यावर आपली पकड मजबूत करत नेली. मंगळवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 119 धावांचे आव्हान रुट-बेअरस्टो जोडीने अवघ्या 20 षटकांच्या आतच पार केले.
इंग्लंडने 76.4 षटकातच 4.93 च्या सरासरीने फटकेबाजी करणे भारताच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले. नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या जो रुटची फलंदाजी अधिक बहरत चालली असल्याचे येथील डावावरुन आणखी एकदा स्पष्ट झाले. रुटने मागील 8 कसोटी डावात 11, नाबाद 115, 176, 3, 5, नाबाद 86, 5 व नाबाद 142 असे लक्षवेधी योगदान दिले आहे. बेअरस्टोने देखील 1, 16, 8, 136, 162, नाबाद 71, 106 व नाबाद 114 अशी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील 4 कसोटीतील धावांच्या यशस्वी पाठलाग करण्यात रुट व बेअरस्टो यांचा तीनवेळा सिंहाचा वाटा राहिला आहे.
डावाअखेर आघाडी घेऊनही या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाची निराशा होणे साहजिक होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रशिक्षणाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतासाठी हा विदेशी भूमीत 4 सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे.
शतक साजरे केल्यानंतर जो रुटचे पिंकी फिंगर सिलेब्रेशन!
एरवी, रुटपेक्षा बेअरस्टो अधिक आक्रमक फलंदाज मानला जातो. मात्र, येथील पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱया डावात बेअरस्टोच्या आधी जो रुटने तडफदार शतक साजरे केलेच. शिवाय, आपण कसोटी क्रिकेटमध्येही फलंदाजीचा पवित्रा बदलला असल्याचे सुस्पष्ट संकेत दिले. मंगळवारी त्याने शतक पूर्ण करताच ‘पिंकी फिंगर सिलेब्रेशन’ केले.
काय असते पिंकी फिंगर सिलेब्रेशन?
रुटने पिंकी फिंगर सिलेब्रेशन केल्यानंतर या अनोख्या सिलेब्रेशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आणि हे सिलेब्रेशन काय असते, हे गूगल केले जाऊ लागले. सदर सिलेब्रेशन अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘एल्विस’ या हॉलीवूड चित्रपटातील एका सीनच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले आहे. चित्रपटात एल्विसची भूमिका साकारणाऱया अभिनेता ऑस्टिन बटलरने पिंकी फिंगर सिलेब्रेशन केले होते, ही त्यामागील पार्श्वभूमी आहे.
भारताला ‘निगेटिव्ह’ क्षेत्ररक्षणाचा फटका
चौथ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे तगडे आव्हान दिल्यानंतर भारताने याचा लाभ घेण्यासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण तैनात करणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात हंगामी कर्णधार जसप्रित बुमराहने डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिडविकेट, डीप फाईनलेग असे पसरवलेले बचावात्मक क्षेत्ररक्षण अंगिकारले आणि संघाला याचा सातत्याने फटका बसत राहिला. क्लासिकल डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजाने (18.4-3-62-0) एकदाही राऊंड द विकेट मारा केला नाही आणि यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना पायचीत करण्यापासून तो दूर राहिला. इतके कमी की काय म्हणून मोहम्मद सिराज (10-0-98-0) व शार्दुल ठाकुर (11-0-65-0) हे भारताचे तिसरे-चौथे पेसर्स कमालीचे निष्प्रभ ठरले.
इंग्लंडकडून 50 चेंडू सीमापार, एकेरी, दुहेरी, तिहेरीच्या माध्यमातून 158 धावा
यजमान इंग्लंड संघाने या सामन्यात एकूण 50 चेंडू सीमापार टोलवले, यात 48 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. याशिवाय, त्यांनी एकेरी-दुहेरी व तिहेरी धावांच्या माध्यमातून 158 धावा फटकावल्या.
कोहलीची जादू हरवली?
जागतिक क्रिकेटमधील फॅब फोर या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱया 4 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये जो रुट, केन विल्यम्सन, स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांचा समावेश होतो. मात्र, यातील विराट कोहली आपली जादू हरवत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील 3 वर्षातील त्याची खराब फलंदाजी चिंतेची बाब असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
कोट्स
इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट कसे खेळले जाते, याचा उत्तम दाखला आम्ही या कसोटी सामन्यात दिला आहे, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. रुट-बेअरस्टो या हंगामात उत्तम खेळत आले असून त्यामुळे माझी जबाबदारी बरीच हलकी झाली आहे.
-इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स
मागील 4 आठवडय़ांमध्ये आमच्या संघाने अतिशय बहारदार खेळ साकारला आहे. जॉनी बेअरस्टोचे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे अव्वल दर्जाची प्रचिती देणारे होते. त्याचा फॉर्म पाहत मी त्याला स्ट्राईक देणे अधिक रास्त होते.
-इंग्लंडचा शतकवीर फलंदाज जो रुट
सामन्यातील पहिले तीन दिवस जोरदार वर्चस्व गाजवल्यानंतरही सामना हातातून सुटू दिला, ही अर्थातच प्रचंड निराशाजनक बाब आहे. पण, इंग्लंडने आक्रमक खेळ साकारला आणि तेच विजयाचे खरे हक्कदार ठरतात.
-भारताचा हंगामी कर्णधार जसप्रित बुमराह