पहिली कसोटी ः स्टोक्सचे अर्धशतक, कसोटी मालिकेत इंग्लंडची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ लंडन
सामनावीर जो रूटच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने रविवारी येथील लॉर्डस् मैदानावर खेळाच्या चौथ्या दिवशी पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 5 गडय़ांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दुसरी कसोटी येत्या शुक्रवारपासून नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळविली जाणार आहे. रूटने कसोटीतील आपले 26 वे शतक झळकविले.
या पहिल्या कसोटीत दोन्ही संघातील गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी केली. न्यूझीलंडतर्फे मिशेलने तर इंग्लंडतर्फे रूटने या सामन्यात शतके झळकविली. खेळाच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 132 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडचे पहिल्या डावात 7 गडी केवळ 116 धावांत बाद झाले होते. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 141 धावांत आटोपल्या इंग्लंडने पहिल्या डावात 9 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. न्यूझीलंड संघाने दुसऱया डावात 285 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडच्या दुसऱया डावात मिशेलने 108 तर ब्लंडेलने 96 झळकविल्या. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 195 धावांची भागिदारी केली.
शनिवारी इंग्लंडच्या दुसऱया डावाला डळमळीत सुरूवात झाली होती. न्यूझीलंडच्या जेमीसनने भेदक मारा केल्याने इंग्लंडची स्थिती एक वेळ 4 बाद 69 होती पण त्यानंतर कर्णधार स्टोक्स आणि रूट यांनी चिवट फलंदाजी करत पाचव्या गडय़ासाठी 90 धावांची भागिदारी केली. स्टोक्सने 3 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावा झळकविल्या. जेमीसनने त्याला झेलबाद केले. तिसऱया दिवसाअखेर इंग्लंडने दुसऱया डावात 5 बाद 216 धावापर्यंत मजल मारली होती. त्यांना विजयासाठी आणखी 61 धावांची जरूरी होती. रूट 77 तर फोक्स 9 धावांवर खेळत होते.
इंग्लंडने 5 बाद 216 या धावसंख्येवरून रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाला प्रारंभ केला आणि 13.5 षटकांच्या खेळामध्ये त्यांनी विजयाचे उद्दिष्ट आणखी पडझड न होता गाठले. इंग्लंडने दुसऱया डावात 78.5 षटकांत 5 बाद 279 धावा जमवित हा सामना 5 गडय़ांनी जिंकला. रूट 12 चौकारांसह 115 तर फोक्स 3 चौकारांसह 32 धावांवर नाबाद राहिले. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 120 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडतर्फे जेमीसनने 79 धावांत 4 तर बोल्टने 73 धावांत एक गडी बाद केला.
येथील ढगाळ हवामानामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळत होती पण आपल्या गोलंदाजांना याचा लाभ घेता आला नाही. याबद्दल न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने निराशा व्यक्त केली. या कसोटीपासून आपल्याला बरेच काही शिकता आले. त्यामुळे पुढील दोन कसोटीत न्यूझीलंडचा संघ अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास कर्णधार विल्यम्सनने व्यक्त केला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड प.डाव सर्वबाद 132, इंग्लंड प. डाव सर्वबाद 141, न्यूझीलंड दु. डाव 91.3 षटकांत सर्वबाद 285, इंग्लंड दु. डाव 78.5 षटकांत 5 बाद 279 (रूट नाबाद 115, फोक्स नाबाद 32, स्टोक्स 54, लीस 20, क्रॉले 9, पोप 10, बेअरस्टो 16, जेमिसन 4-79, बोल्ट 1-73).
10,000 धावांचा माईलस्टोन गाठणारा रूट इंग्लंडचा दुसरा फलंदाज
या सामन्यात रूटने 26 वे शतक झळकवताना कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रूट हा 14 वा तर इंग्लंडचा दुसरा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे चौथ्या डावात खेळताना त्याने नोंदवलेले हे पहिलेच शतक आहे. 77 व्या षटकात त्याने साऊदीला फ्लिक करीत हा माईलस्टोन गाठला. इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलेस्टर कूक हा दहा हजार धावांचा टप्पा पहिल्यांदा गाठला होता. त्याने 161 कसोटीत 12,472 धावा 45.35 च्या सरासरीने जमविल्या. त्यात 33 शतके व 57 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर (15.921), रिकी पाँटिंग (13.378), जॅक्वीस कॅलिस (13,289), राहुल द्रविड (13,288), ऍलेस्टर कूक (12,472) यांच्या अन्य आठ फलंदाजांच्या पंक्तीत आता रूटनेही स्थान मिळविले आहे.