उंट, हत्ती, घोडे, बैलगाडी यांचा समावेश, अनेक चित्ररथांनी भरली मिरवणुकीत रंगत
प्रतिनिधी/ सातारा
सजवलेले 4 उंट, हत्ती, 24 घोडे, 3 बैलगाडय़ा, बालमावळे, पारंपारिक वेषातल्या महिला, पुरूष, संबळवाद्य, ढोलताशा, झांजपथकांमध्ये सायंकाळी उशिरा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली भव्य शाही मिरवणुकीला सायंकाळी उशिरा गांधी मैदान येथून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीमध्ये खास वैशिष्टय़ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपट अनेक चित्ररथातून बालकलाकार साकारत होते. या मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणावर सातारकर सहभागी झाले होते. त्यामुळे शाहूनगरी शिवमय झाली होती. रात्री उशिरा मिरवणूक शिवतीर्थावर पोहोचली. यावेळी आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.
शाही मिरवणुकीला प्रारंभ सायंकाळी उशिरा झाला. तत्पूर्वी महिलांची दुचाकी रॅली शहरातून काढण्यात आली. त्या रॅलीचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील, माजी नगरसेविका सौ. दीपलक्ष्मी नाईक, सौ. लीना गोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. त्यांची दुचाकी रॅली मोती चौक, सदाशिव पेठ, पाचशे एक पाटी, पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा राजपथ मार्गे गांधी मैदानावर समारोप झाला. त्यानंतर सायंकाळी आमदार शिवेंद्रराजे यांच्या आगमनानंतर श्रीफळ वाढवून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे-पाटील, राजू गोरे, अशोक मोने, अजित साळुंखे, युवराज जाधव, बाळासाहेब महामुलकर, अमित सोळंकी, रवी माने, हर्षल चिकणे, प्रवीण पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा
सजवलेल्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळण्याचा कार्यक्रम सुरुवातीला करण्यात आला. उपस्थित महिला पदाधिकाऱयांनी हा सोहळा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा झाल्यानंतर प्रत्यक्ष मिरवणुकीला प्रारंभ झाला. पाळणा सादर करण्यामध्ये महिला पदाधिकाऱयांनी सहभाग नोंदवला होता.
भारतमाता मंडळांचे झांज पथक व संबळ वाद्य
सदरबाजारमधील भारतमाता मंडळाचे झांज पथक या मिरवणुकीत अग्रभागी होते. विशेष म्हणजे झांज पथकातील ढोलांचा ताल दणाणून सोडत होता. दरम्यान, संबळ वाद्यही उत्साह वाढवत होता.
कलाकारांनी मिरवणूकीत साकारली चित्रे
या मिरवणुकीत अनेक चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट साकारला गेली. त्यांची कलाही एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येत होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली होती. रात्री उशिरा शिवतीर्थ येथे मिरवणूक पोहोचली.